Vidarbha Express : राजकारणात काहीही अशक्य नाही असे नेहमी म्हटले जाते. पण याचा प्रत्यक्ष अनुभव गोंदियावासीयांना बुधवारी (21 ऑगस्ट) आला. एरवी वेळेवर न येणारी विदर्भ एक्स्प्रेस बुधवारी मात्र ‘राईट टाईम’ गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचली. त्यामुळे प्रवाशांसह गोंदियावासीयांना सुखद धक्का बसला. रेल्वे प्रशासनात झालेल्या बदलाने प्रवासी सुद्धा काही क्षण गोंधळले. मात्र राज ठाकरे गाडीमध्ये असल्यामुळे हे घडू शकले. हे लक्षात आल्यावर ‘राजसाहेब असेच गोंदियाला येत राहा’ अशी भावना लोकांनी व्यक्त केली.
बुधवारी (21 ऑगस्ट) मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ एक्सप्रेसने गोंदियात आले. त्यांची ही यात्रा सुखद न झाल्यास आपल्या मागे नसत्या उचापती लागू नये म्हणून रेल्वे प्रशासनाने एक मास्टर कम ॲक्शन प्लॅन आखला. राज ठाकरे प्रवास करीत असलेली विदर्भ एक्सप्रेस काही झालं तरी वेळेत गोंदिया स्थानकावर पोहोचविण्यासाठी प्रशासनाचा खटाटोप सुरू झाला. इतर प्रवासी गाड्यांच्या सोबत मालवाहतूक गाड्यांमध्येही वेळेत बदल केला. रस्त्यावरील सुरक्षा फाटक विदर्भ एक्सप्रेस येण्याच्या 15 मिनिट आधीच बंद केला असावा. किंबहुना चक्क रेल्वे रुळच रिकामा तर केला नसावा, अशी शंका गोंदियावासी व्यक्त करीत आहेत.
गोंदिया स्थानकावर घोषणा सुरु झाली. विदर्भ एक्स्प्रेस आपल्या निर्धारित वेळेत फलाट क्रमांक 1 वर पोहचत आहे. नेहमी फलाट क्रमांक 5 वर येणारी विदर्भ एक्स्प्रेस फलाट क्रमांक 1 वर आली. अचानक झालेली घोषणा व वेळेत आलेली विदर्भ एक्सप्रेस यामुळे प्रवासी सुद्धा काही क्षण गोंधळले. मात्र खरे कारण ही लगेच कळले. या गाडीतून मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे खाली उतरले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा सर्व खटाटोप राज ठाकरे यांच्यासाठी होता हे लक्षात आले. विदर्भ एक्स्प्रेस उशिरा येऊ नये व गाडीमधून खाली उतरताना गैरसोय होऊ नये यासाठी हे सारे होते.
या चमत्काराबद्दल काही उत्साही प्रवाशांनी फलाटावर उपस्थित मनसे पदाधिकाऱ्यांना विचारले. तर रेल्वे विभागाला आठ दिवसांपूर्वीच पत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. एरवी वेळेवर न येणारी विदर्भ एक्स्प्रेस बुधवारी मात्र राज ठाकरे यांच्यामुळे वेळेत गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहोचली. हा आनंद क्षणिक आहे हे ओळखून ‘राजसाहेब असेच गोंदियाला येत राहा’ अशी मागणी करीत आहेत.