Request From BJP : गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेला अपमान, तुम्ही अपेक्षित नाही असे सातत्याने कानावर पडणारे शब्द आणि अखेरच्या क्षणी नाकारण्यात आलेली उमेदवारी यामुळं माजी नगराध्यक्ष हरीश अलीमचंदानी भाजपवर नाराज झाले आहेत. त्यांनी आता अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हरीशभाईंचा अर्ज दाखल होताच भाजप नेत्यांच्या शब्दांमध्ये अचानक नरमाई आली आहे. प्रत्येक ठिकाणी हरीशभाई यांना ‘तुम्ही या ठिकाणी अपेक्षित नाही’ असं सांगत बाहेर काढणारे नेते आता त्यांच्या पाया पडायलाही तयार झाले आहेत.
हरीशभाईंची समजूत काढण्यात स्थानिक नेते अपयशी ठरले आहेत. त्यामुळं आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खास दूत हरीशभाईंच्या संपर्कात आहेत. विक्की कुकरेजा असं या खास दुताचं नाव आहे. नागपुरात विक्की कुकरेजा हे देवेंद्र फडणवीस यांचे सगळ्यात नीकटवर्तीय आहेत. जरीपटका भागात राहणारे कुकरेजा सिंधी समाजाचे नागपुरातील मोठे नाव आहे.
बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणापूर्वी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी एकाच वाहनातून प्रवास केला होता. फडणवीस यांनी हे वाहन चालविले होते. या वाहनाच्या मुद्द्यावरून वादही निर्माण झाला होता. हे वाहन विक्की कुकरेजा यांच्याच मालकीचे होते. यावरून कुकरेजा यांना फडणवीस यांनी हरीश हलीमचंदानी यांच्याशी बोलणी करण्यासाठी का निवडले याची कल्पना येऊ शकते. भाजपकडून अद्याप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे किंवा स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी हरीश अलीमचंदानी यांच्याशी संपर्क केलेला नाही. कुकरेजा यांच्या माध्यमातून नेत्यांनी अलीमचंदानी यांचा पारा किती चढलेला आहे आणि कोणाविरुद्ध चढलेला आहे, याचा अंदाज घेण्यात आला.
वेगवेगळ्या ऑफर
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून जुने पदाधिकारी, नेत्यांना खुलेआम अपमान करण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. लोकसभा निवडणूक काळातही या तक्रारी झाल्या होत्या. अनेक ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना भर बैठकीतून बाहेर काढण्यात आले. काहींना वरिष्ठ नेत्यांच्या स्वागतप्रसंगी विमानतळावरून बाहेर काढण्यात आले. त्यामुळं या ठराविक नेत्याचे ड्रायव्हर, लहान मुलं, शेजारी हे भाजपचे पदाधिकारी आहेत का, असा प्रश्न आता पुन्हा उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळं आमच्या सारखे जुने, ज्येष्ठ पदाधिकारी अपेक्षित नाही, तर कोण अपेक्षित आहे, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
‘द लोकहित’ने नमूद केल्याप्रमाणं हरीश अलीमचंदानी यांच्यासोबत चर्चा करताना अकोल्याच्या महापौर पदावरही चर्चा झाली. याशिवाय कुकरेजा हे स्वत: सिंधी समाजाचे असल्यानं त्यांनी अकोल्यातील सिंधी समाज, सिंधी व्यापाऱ्यांसाठी महायुतीचं सरकार आल्यास कोणते लाभ मिळतील, याबद्दल काही संकेत दिले आहेत. अकोल्यात हरीश अलीमचंदानी यांनी अर्ज मागे घ्यावा, अशी गळही भाजपच्यावतीनं त्यांना घालण्यात आली आहे. अलीमचंदानी हे कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेतील याची खात्री भाजपला आहे. त्यामुळे सगळेच नेते निश्चिंत आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्तेही ‘हरीशभाई अॅडजेस्ट हो जाएंगे’ अशा आत्मविश्वासासह वावरत आहे. मात्र हरीश अलीमचंदानी यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे, हे तूर्तास तरी केवळ त्यांनाच ठाऊक आहे.