Word Of Phrase : माजी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या कामाची प्रशंसा करावी तेवढी कमी आहे. राज्यपाल म्हणून पुरोहित यांनी अनेक राज्यांचा कारभार पाहिला. त्यांनी जितक्या राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहिले, ते पाहता त्यांच्यात सकारात्मक काम करण्याची प्रचंड ऊर्जा दिसून येते. नागपुरातील रामदेव बाबा विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पुरोहित यांची तोंडभरून स्तुती केली.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यपाल तथा रामदेव बाबा विद्यापीठाचे बनवारीलाल पुरोहित, सत्यनाराण नुवाल, रामदेवबाबा विद्यापीठाचे कुलपती डॉ. शंकर मंथा, कुलगुरू डॉ. राजेश पांडे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. रामदेव बाबा विद्यापीठात उपराष्ट्रपतींच्या हस्ते डिजिटल टॉवरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात बनवारीलाल पुरोहित यांचा मार्गदर्शक म्हणून उल्लेख केला. पुरोहित यांनी शिक्षण व राजकीय वर्तुळात निरपेक्ष भावनेने केलेल्या कामांचा पाढा त्यांनी उपराष्ट्रपतींना वाचून दाखविला.
समान अधिकार गरजेचा
आपल्या भाषणात उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, सर्वांना समान अधिकार नसतील तर लोकशाहीला अर्थ उतरणार नाही. कायद्यापुढे सर्वांना समान वागणूक दिला जाणे गरजेचे आहे. तरुणांईच्या हाताला आतापर्यंत काम नव्हते. त्यांना भरकटविण्यात येत होते. पण आता काळ बदलला आहे. जगातील अनेक देश भारताच्या तरुणाईकडे आशेने पाहात आहेत. जगाच्या पाठीवर भारतीय तरुणाईकडे प्रतिभा आहे. भारत केवळ लोकशाहीप्रधान देश आहे, हे म्हटल्याने काही होणार नाही. लोकशाहीची मूल्ये खोलपर्यंत रुजणे गरजेचे आहे.
आगामी काळात ‘एआय’ मोलाची भूमिका निभावणार आहे. या तंत्रज्ञानाचा मानवी कल्याणासाठी वापर होणे गरजेचे आहे. ‘एआय’ मानवी जीवनावर हावी होणार नाही, याची काळजी मात्र सर्वांना घ्यावी लागणार आहे. काळानुसार बदलतेच तंत्रज्ञान आत्मसात करावेच लागणार आहे. अन्यथा स्पर्धेच्या युगात आपण मागे पडू. परिवर्तन हा सजीव सृष्टीतील नियम आहे. त्यामुळे काळानुसार तरुणांनीही अध्ययन आणि अध्यापन यातील बदल स्वीकारावे, असे उपराष्ट्रपती धनखड म्हणाले.
‘स्काय इज नॉट लिमिट’
तंत्रज्ञानाच्या युगात ‘स्काय इज नॉट लिमिट’ असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. आता मानव अंतरिक्षाच्याही पलीकडे जात आहे. इंस्रोने हे सिद्ध केले आहे. जगाताच्या पाठीवर भारताची ओळख बदलली आहे. भारताला जगाच्या पाठीवर तिसरी मोठी आर्थिक महासत्ता व्हायचे आहे. हे स्वप्न अशक्य नाही. आजचा भारत जगातील कोणत्याही देशाचा गुलाम नाही. भारत काय विचार करतो, याचा विचार अनेक देशांना करावा लागत आहे. कोणत्याही दोन देशात वाद झाला, तर आता भारताला हस्तेक्षेप करण्याची विनंती करण्यात येते.