महाराष्ट्र

Rajya Sabha : उपराष्ट्रपतींचे रणदीप सुरजेवालांना बाहेर जाण्याचे निर्देश

Parliament Session : शेतकऱ्यांवरील चर्चेदरम्यान गोंधळ

Farmer Issue : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस शेतकऱ्यांवरील चर्चेने गाजला. विशेषत: राज्यसभेत या मुद्द्यावरून गोंधळ उडाला. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा होत असताना काँग्रेसच्या खासदारांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. सुरूवातीला उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे खासदार जगदीप धनखड यांनी सदस्यांना शांत राहण्याच्या सूचना केल्या. गदारोळ वाढल्याने धनखड यांना अखेर कठोर भूमिका घ्यावी लागली. धनखड यांनी माइकवरून काँग्रेस खासदार रणदीप सुरजेवाला यांचे नाव जाहीर केले. त्यांनी सुरजेवाला यांना सभागृहाबाहेर जाण्याचे निर्देश दिले.

सभापतींच्या निर्देशांनंतरही सुरजेवाला राज्यसभेतून बाहेर गेले नाहीत. त्यामुळे धनखड यांनी त्यांना चांगलेच सुनावले. अन्नदात्यांचा आदर करा. शेतकऱ्यांसंदर्भात विषयांवर चर्चा करा. सभागृहाच्या कामात व्यत्यय आणू नका, असे धनखड यांनी सुरजेवाला आणि काँग्रेस नेते प्रदीप तिवारी यांना बजावून सांगितले. जगदीप धनखड यांनी काँग्रेस खासदार प्रदीप तिवारी यांना सांगितले की, तुम्ही अन्नदात्याचा आदर करत नाही. त्यामुळेच तुम्ही चर्चेदरम्यान गोंधळ निर्माण करत आहात. शेतकऱ्यांच्या वेदना मला कळतात.

दोन्ही सभागृहात वादळ

संसदेच्या लोकसभा व राज्यसभा दोन्ही सभागृहात शुक्रवारी (ता. 26) गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे लोकसभेचे कामकाजही अध्यक्ष ओम बिर्ला यांना तहकुब करावे लागले. राज्यसभेतही काँग्रेसने चांगलाच गोंधळ घातला. धनखड आणि काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरू असताना प्रदीप तिवारी यांनीही धनखड यांना उत्तर दिले. त्यामुळे धनखड संतापले. तुम्ही प्रमाणित शेतकरी नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, असे धनखड यांनी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांना सुनावले. लोकसभा खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा यांनी नोकरीसाठी व्हिसाशिवाय (डंकी रूट) परदेशात जाणाऱ्या तरुणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला.

गेल्या वर्षभरात 97 हजार तरुण व्हिसाशिवाय अमेरिकेत गेले याकडे त्यांनी लक्ष वेधले. 15 लाख भारतीय कागदपत्रांशिवाय राहत आहेत. यावरही त्यांनी सरकारला जाब विचारला. अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी गुरुवारी (ता. 25) बांगलादेशी घुसखोरीचा मुद्दा सभागृहात गाजला. झारखंडमधील गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी संविधान धोक्यात असल्याचे म्हटले. अधिवेशनाला सुरुवात झाली, त्या दिवसापासून काँग्रेस सध्या आक्रमक दिसत आहे. 24 जुलै पासून संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेसचे सदस्य गोंधळ घालताना दिसत आहे. सभागृहाबाहेर मात्र काँग्रेस सरकारला चर्चा करायची नाही, असा आरोप करीत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!