Gondia News : मेहनत आणि इमानदारीने केलेल्या कामाची पोचपावती ईश्वर कोणत्या ना कोणत्या प्रकारे देतोच. याची प्रचिती गोंदियात आली आहे. नरेंद्र मोदी यांचा ‘वंदे भारत रेल्वे’ हा अभिनव प्रयोग यशस्वी झाला आहे. यासाठी सहाय्यभूत ठरलेल्या लोको पायलटला थेट मोदी यांनी आपल्या शपथविधिचे निमंत्रण दिले आहे. मोदी यांनीच निमंत्रण पाठवून सन्मान केल्याने गोंदियातिल रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत. या सोहळ्यासाठी देश, विदेशातील विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले आहे. या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागांतर्गत गोंदिया येथे कार्यरत सहाय्यक लोको पायलट स्नेहसिंह बघेल यांना निमंत्रित करण्यात आले. ‘वंदे भारत’ टीमचे एक प्रमुख सदस्य म्हणून बघेल यांना हे निमंत्रण मिळाले आहे.
कोण आहेत बघेल?
स्नेहसिंह बघेल हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या गोंदिया लाॅबीत कार्यरत आहेत. ते वरिष्ठ सहाय्यक लोको पायलट म्हणून गेल्या चार वर्षापासून कार्यरत आहेत. बघेल हे मिशन कर्मयोगी अंतर्गत प्रशिक्षण प्राप्त करणारे सहाय्यक लोको पायलट आहेत. बघेल नागपूर-बिलासपूर वंदेभारत एक्सप्रेसच्या शुभारंभादरम्यान होते. ते लोकाे पायलटच्या दलात सहभागी होते. वंदे भारत ट्रेनसह इतर रेल्वे गाड्यांसाठी बघेल यांनी केलेल्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली.
रविवारी होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी बघेल यांना निमंत्रित केले आहे. बघेल यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाल्याने रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांत खुश झाले आहेत. हा आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव असल्याचे सर्वांनी सांगितले. सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी गोदियाहून बघेल शुक्रवारी रवाना झालेत. दिल्लीत सुरक्षेच्या प्रक्रिया दृष्टिकोनातून त्यांना पोहोचण्याचा निरोप पंतप्रधान कार्यालयाने दिला होता. बघेल हे शुक्रवारी विमानाने दिल्लीत पोहोचले आहेत. या सोहळ्याच्या निमित्ताने सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची त्यांना संधी मिळाली आहे हे विशेष.
नागपुरात झाली होती भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ झाला होता. त्यावेळी देखील बघेल यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर आता पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदी हे बघेल यांना भेटणार आहेत. पंतप्रधानांच्या शपथविधीला रेल्वे कर्मचाऱ्याला बोलावण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.