महाराष्ट्र

Assembly Elections : विधानसभेसाठी ‘वंचित’ झाली सज्ज

Vanchit Bahujan Aghadi : स्वबळावर लढण्यासाठी पुन्हा तयारी सुरू

Vidhan Sabha Election : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी पुन्हा ऍक्शन मोडमध्ये आली आहे. स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी वंचितने केली असल्याचे बोलले जात आहे. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त 26 जूनपासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार असल्याचे वंचितकडून जाहीर करण्यात आले आहे. तसेच, विधानसभा उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जुलै ठरवण्यात आली आहे.

https://whatsapp.com/channel/0029VaUpEJn7YSd10QyUIR35

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने तयारी सुरू केली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक लढवू, इच्छुकांकडून अर्ज मागविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. तसेच, अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडी उमेदवार निवडण्याच्या प्रक्रियेत कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून त्यांचे मत जाणून घेईल, असेही रेखा ठाकूर म्हणाल्या.

पसंतीचा मतदारसंघ मिळेल

पक्षाने त्यांच्या एक्स हँडलवर गुगल फॉर्मसाठी ऑनलाईन लिंक पोस्ट केली आहे. यामध्ये काही प्रश्न विचारण्यात आले असून, अर्जदारांना त्यांचा वैयक्तिक तपशील, त्यांच्या पसंतीचा विधानसभा मतदारसंघ आणि वंचित बहुजन आघाडीने त्यांना उमेदवारी का द्यावी, याची माहिती भरण्यास सांगितले आहे. याबरोबरच फॉर्ममध्ये अर्जदारांना बायोडेटात त्यांनी समाजासाठी केलेल्या कमीतकमी 5 योगदानाची यादी नमूद करावी लागणार आहे.

Monsoon session : ‘सरकारचा चहा घेणे हा जनतेचा अपमान’

रेखाताई ठाकूर पुढे म्हणाल्या की, छत्रपती शाहू महाराज हे फुले आणि आंबेडकर यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. आपल्या 28 वर्षांच्या कारकिर्दीत उपेक्षित, शोषित बहुजनांवर दूरगामी परिणाम करणाऱ्या सामाजिक व कायदेविषयक सुधारणा करण्यात शाहू महाराजांना यश आले. या प्रक्रियेत त्यांनी फुलेंकडून क्रांतीची मशाल घेऊन आंबेडकरांपर्यंत पोहोचवली, असल्याचेही त्या म्हणाल्या.

आज सर्वच पक्षांनी फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेचा निवडणुकीच्या फायद्यासाठी वापर केला आहे. पण, शाहू महाराजांच्या सुधारणा, विशेषत: वंचितांसाठीच्या सकारात्मक कृतींना या पक्षांनी जाणून घेतले नाही. हे पक्ष वेळोवेळी सत्तेत आले पण, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेला बाधा निर्माण करत राहिले. त्यामुळेच वंचित बहुजन आघाडीने आपली निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीची निवड केली. आगामी काळात वंचित बहुजन आघाडी केवळ वंचितांचे रक्षण आणि सकारात्मक कृती राबविण्यासाठी अभियान राबवणार नाही, तर मतदारांशी सखोल संबंध निर्माण करण्यासाठी सक्रियपणे काम करेल, असेही त्यांनी म्हटले.

विधानसभा निवडणुकीत उमेदवारी पाहिजे असणाऱ्यांना अर्ज पाठविण्यासाठी पक्षाने ऑनलाईन पर्यायासह वंचित बहुजन आघाडीच्या मुंबई कार्यालयात अर्ज पाठविण्याचा पर्यायही दिला आहे. वंचित बहुजन आघाडीने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 38 जागा लढविल्या होत्या आणि 15 लाखांहून अधिक मते मिळविली होती. आता महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!