Assembly Election : लोकसभा निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला आता विधानसभा निवडणुकीसाठी आयोगाने चिन्ह दिले आहे. विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी पक्ष गॅस सिलिंडर हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. ‘वंचित’च्या या चिन्हामुळे नेमके कोण गॅसवर जाणार हे पाहण्यासारखे राहणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. 16) हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा केली.
सुरक्षेच्या कारणामुळे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नंतर जाहीर होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा, संमेलन, दौरे सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच राजकीय पक्ष लागले आहेत. जागा वाटपावरून चर्चा केली जात आहे. अशातच राज्यातील महत्वाचा पक्ष समजल्या जाणाऱ्या वंचित बहुजन आघाडीबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
चिन्हाचे वाटप
लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला एक चिन्ह मिळाले नव्हते. त्यामुळे मतदारसंघनिहाय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी लागली होती. मात्र आता एकाच निवडणूक चिन्ह वंचित बहुजन आघाडीला मिळाले आहे. त्यानुसार ‘वंचित’ गॅस सिलिंडर या चिन्हावर निवडणूक लढविणार आहे. त्याबाबत आयोगाने एक पत्रक जाहीर केले आहे. राज्यात वंचित बहुजन आघाडी ज्या मतदारसंघात उमेदवार उभे करेल, त्यांना गॅस सिलिंडर हे चिन्ह मिळेल. त्यामुळे चिन्हाबाबतचा ‘वंचित’चा सध्या प्रश्न सुटला आहे.
2019 लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची मोठी ताकद होती. या निवडणुकीत एमआयएमसोबत (AIMIM) युती केलेल्या वंचित बहुजन आघाडीने भरघोस मतदान मिळविले. याचा मोठा फटका काँग्रेसला बसला होता. अनेक ठिकाणी मतांचे विभाजन झाल्याने काँग्रेसचे दिग्गज उमेदवार पराभूत झालेत. 2024 मधील लोकसभा निवडणुकीत ‘वंचित’ महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) जाईल, अशी चर्चा होती. मात्र तसे झालेच नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले.
आता विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. ‘वंचित’कडून आगामी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ‘वंचित’च्या नव्या ‘गॅस सिलिंडर’मुळे नेमके कोण गॅसवर जाणार आणि कोणाची सत्तेची पोळी शेकली जाणार, हे पाहावे लागणार आहे. घोडामैदान जवळच आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी कोणासोबत जाणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.