शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका केली होती. टीकेला आता वंचितकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. ‘संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिलं नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी ते तोल गेल्याप्रमाने बरळत आहेत. संजय राऊतांमुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कोणी मोजत नाही,’ अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे, असं विधान केलं होतं. दरम्यान आंबेडकरांच्या या विधानानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना खोचक टोला लगावला. “बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वारसदार रामदास आठवले आहेत”, असं म्हणत संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना लक्ष केलं होतं. त्यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले होते.
खऱ्या खोट्याचा भान नाही
आता वंचित बहुजन आघाडीकडून संजय राऊत यांना लक्ष करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर आणि प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. रेखा ठाकूर म्हणाल्या, ‘संजय राऊत यांना खऱ्या खोट्याच भान राहिलेलं नाही. वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाने बरळत आहे. संजय राऊतामुळे त्यांचा अख्खा पक्ष सोडून गेला. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात कोणी प्रगल्भ राजकारणी मानत नाही.’ संजय राऊत यांची भूमिका हीच उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भूमिका आहे का? महाविकास आघाडीची अधिकृत भूमिका समजायची का असा सवालही त्यांनी केला आहे.
संजय राऊत ज्यांना आज देशद्रोही म्हणत आहेत, त्यांना वाढवण्याचे पाप हे शिवसेनेचेच आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या गोध्रा हत्याकांडाच्यावेळी नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचे काम शिवसेनेनेच केलं. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून संविधानाच्या मुद्द्यावर ते किती प्रामाणिक आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्यावे, असंही ठाकूर म्हणाल्या.
वंचितला बैठकीला बोलवण्याचे टाळणारे म्हणत आहेत की 7 जागा देऊ केल्या होत्या. संजय राऊत थापा मारत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला संविधानाची शपथ देऊन मते घेतली आणि आता त्याच संविधानातील आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलेले असताना शिवसेना भूमिका स्पष्ट का करत नाही? असा सवाल ही त्यांनी राऊत यांना विचारला आहे. दरम्यान युती तुटल्यानंतर शिवसेना ठाकरे गट विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा सामना रंगला आहे.
पुंडकर यांचीही टीका
वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनीही संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पुंडकर म्हणाले, राऊत यांनी वंचित बहुजन आघाडीविषयी बोलताना धादांत खोटारडेपणा केला आहे. संजय राऊत यांचा खोटारडेपणा आता उघड झालाय. वंचित बहुजन आघाडीनेच सुरुवातीपासून महाविकास आघाडीला सतत सांगितले होते की, आपण एकत्र लढूया. मविआने चर्चेमध्ये झुलवत ठेवले आणि सोबत घेतले नाही, ही वस्तुस्थिती जनतेलाही माहीत आहे. त्यामुळे, संजय राऊत आतातरी खोटे बोलणं बंद करतील, अशी अपेक्षा आहे, असेही पुंडकर म्हणाले.