VBA : महायुतीच्या उमेदवारांसाठी अनेक मतदारसंघात 40 कोटी रुपये पाठविण्यात आले आहेत. मेहकर मतदारसंघातही 40 कोटी रुपये आल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यातून 10-10 हजार रुपये देऊन मत विकत घेण्याचा प्रकार घडू शकतो. त्यामुळे धाडी टाकून पोलीस हा पैसा जप्त करतील का? मी यादी देतो; परंतु हा पैसा पकडू नका, वाटून मिळून खा, खिशात टाकून मोकळे व्हा, असा सल्ला वजा उपरोधिक टोलाही आंबेडकर यांनी लगावला आहे.
मेहकर येथे 11 नोव्हेंबरला रात्री वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराकरिता आयोजित सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘कोणाला कितीही पैसा वाटू द्या; परंतु उद्याच्या पिढीचा विचार करा. नंतरच मतदान कोणाला द्यायचे ते ठरवा. भारतीय संविधानाचे रक्षण करायचे असेल, शेतकरी, कष्टकरी आणि तळागाळातील वंचित जनतेला न्याय द्यायचा असेल, तर आता परंपरागत पक्षांना पर्याय देऊन परिवर्तन घडवायला पाहिजे.’
स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली, तरीही देशाचे, राज्याचे चित्र बदलले नाही. जनसामान्यांच्या प्रश्नाला जर वाचा फोडायची असेल, तर मोठ्या ताकदीने सर्वसामान्य जनतेने उभे राहिले पाहिजे. यावेळेस निवडणूक ही आरक्षणाच्या मुद्द्यावर लढविल्या जात आहेत. इतर कोणताही मुद्दा समोर घेऊन पक्ष समोर आलेले नाहीत, असेही अॅड. आंबेडकर म्हणाले.
ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा घाट
विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ओबीसींचे आरक्षण संपविण्यात येणार, असा दावाही अॅड. आंबेडकर यांनी केला. नव गठित विधानसभेत ओबीसी आरक्षणाविषयी ठराव घेण्यात येणार आहे. त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेतला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले आहे त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांसोबत त्यांचे सुपुत्र सुजात आंबेडकरही मैदानात उतरल्याची दिसून येत आहे. तीन दिवसांपूर्वी सुजात आंबेडकर यांची खामगाव येथे जाहीर सभा झाली होती त्यानंतर सोमवारी मेकर विधानसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली.