महाराष्ट्र

Vanchit Bahujan Aghadi : स्टार प्रचारकांच्या यादीत 20 जणांचा समावेश

Assembly Election : प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, अंजली आंबेडकर करणार प्रचार 

War For Votes : विधानसभा निवडणुकीमध्ये मैदानात असलेल्या वंचित बहुजन आघाडीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. एकूण 20 नेत्यांचा यादीमध्ये समावेश आहे. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी निवडणूक आयोगाकडे ही यादी सादर केली आहे. यात रेखा ठाकूर यांच्यासह प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर, मुलगा सुजात आंबेडकर यांच्या नावाचाही समावेश आहे. 

पक्षाच्या राज्यस्तरीय स्टार प्रचारकांची यादी जाहीर करीत वंचित बहुजन आघाडी आरक्षण बचाव हा प्रमुख नारा असल्याचे सांगितले आहे. भीमराव आंबेडकर, अशोक सोनोने, अकोल्यातील डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे आणि भास्कर भोजने यांचीही निवड स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत प्रकाश आंबेडकर हे रुग्णालयात उपचार घेत आहेत. अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर त्यांच्यावर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असताना आंबेडकर यांनी शनिवारी (2 नोव्हेंबर) व्हिडीओ संदेश जारी केला.

आरक्षणाला धोका 

प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या व्हिडीओमध्ये निवडणुकीनंतर ओबीसी आरक्षण संपेल असा दावा केला आहे. आंबेडकर यांच्या या दाव्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ता सिद्धार्थ मोकळे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. सिद्धार्थ मोकळे यांनी ‘द लोकहित’शी बोलताना वंचित बहुजन आघाडीचा मुख्य अजेंडा आरक्षण बचाव राहणार असल्याचे स्पष्ट केले. शनिवारी रात्री स्टार प्रचारकांची यादी वंचित बहुजन आघाडीने जाहीर केल्यानंतर पुढील व्यूहरचना तयार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर वंचित बहुजन आघाडी पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करणार आहे. या जाहीरनाम्यामध्ये आरक्षण बचावसह अनेक मुद्द्यांचा समावेश असेल. संविधानानुसार मिळालेले आरक्षण काढून घेण्याचे षडयंत्र केले जात आहे. त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण जाणार नाही, यासाठी वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत प्रयत्न करणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरच प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते सध्या बोलत आहेत.

Prakash Ambedkar : आयसीयूमधून प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केला धोका

संवेदनशील मुद्दे 

अलीकडेच प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील विविध भागांचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी अनेक संवेदनशील मुद्द्यांना हात घातला. शरद पवार हे दाऊद इब्राहिमला भेटून आले, असा खळबळजनक दावाही त्यांनी केला होता. निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी कोणकोणत्या मुद्द्यांवर भाष्य करणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. वंचित बहुजन आघाडीने मुस्लिम समाजासह वेगवेगळ्या घटकांना उमेदवारी दिली आहे. या सोशल इंजिनिअरिंगचा किती प्रभाव पडेल हे लवकरच दिसणार आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!