महाराष्ट्र

Badlapur Cases : ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करा!

Ujjwal Nikam : वंचित बहुजन आघाडीची मागणी; बदलापूर प्रकरणात विरोधकांचा आक्षेप

Vanchit Bahujan Aghadi : विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची बदलापूर प्रकरणात नियुक्ती करण्यात आल्यानंतर विरोधकांकडून निकम यांना विरोध केला जात आहे. काँग्रेसनंतर वंचित बहुजन आघाडीकडूनही सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. ॲड. उज्ज्वल निकम हे भाजपचे हितसंबंधी आहेत. त्यामुळे या केसमध्ये सरकारी वकील म्हणून झालेली त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

बदलापूर येथील आदर्श विद्यालयात दोन बालिकांवर झालेल्या लैंगिक अत्याचाराची घटना संतापजनक आहे. शाळेच्या संचालक मंडळाची प्रकरण दडपून टाकण्याची भूमिका त्याहीपेक्षा संतापजनक आहे. आणि पोलीसांनी केस नोंदवून घेण्यात केलेली दिरंगाई अक्षम्य आहे. या परिस्थितीत बालिकांना न्याय व सुरक्षा मिळवून देण्यात अपयशी ठरलेल्या यंत्रणांविरोधात जनक्षोभ उफाळून आला. 20 ऑगस्ट रोजी लोकांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. लोकांचा राग संस्थाचालकांवर आहे त्याचप्रमाणे पोलीस खात्यावरही आहे. वंचित बहुजन आघाडी या घृणास्पद घटनेतील गुन्हेगार शिंदे, घटना झाकून ठेवणारे शाळेचे संचालक मंडळ व पोलीस खाते या सर्वांचा तीव्र निषेध करत आहे, असे संघटनेने म्हटले आहे.

Sexual Assault : गावकरी अक्षयच्या घरात घुसले अन्..

 या घटनांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी 21 ऑगस्ट रोजी बदलापूर पोलीस ठाण्यात सहपोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन माहीती घेतली. शाळेचे संचालक मंडळ भारतीय जनता पक्षाशी व आरएसएसशी संबंधित आहे अशी माहिती आहे. त्यामुळेच हे प्रकरण हाताळताना राजकीय हस्तक्षेप होऊ शकेल अशी भीती लोकांना वाटत आहे. अशात भाजपचे लोकसभेचे उमेदवार ॲड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकिल म्हणून झालेली नियुक्ती साशंकता निर्माण करणारी असल्याचा आरोप वंचितने केला आहे.

दरम्यान या बालिकांना न्याय मिळवून देण्यासाठी व न्यायप्रक्रिया पारदर्शक व कोणत्याही दबाव व हस्तक्षेपापासून मुक्त राहील अशी ग्वाही जनतेला मिळाली पाहीजे. उज्वल निकम यांची खैरलांजी हत्याकांड केस, मोहसीन शेख हत्या प्रकरणातील भूमिका संशयास्पद असल्याचं वंचितने म्हटलं आहे. दुसरे म्हणजे ॲड. उज्ज्वल निकम हे भाजपचे म्हणून या प्रकरणात हितसंबंधी आहेत. त्यामुळे या केसमध्ये सरकारी वकील म्हणून झालेली त्यांची नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!