विधानसभा निवडणुकीसाठी मनसेसह काही पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. आता वंचित बहुजन आघाडीकडूनही विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे तिसरी आघाडी स्थापन होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. वंचित आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पहिली यादी 21 सप्टेंबर रोजी जाहीर केली.
आंबेडकरांनी जाहिर केलेल्या यादीत विदर्भासह मराठवाडा आणि इतर मतदारसंघांतील उमेदवारांचा समावेश आहे. तर यादीमध्ये उमेदवारांच्या नावासमोर जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे. तर यादीत एका तृतीयपंथी उमेदवाराचाही समावेश आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे महाविकास आघाडीशी फिस्कटलेले आहे. त्यामुळे महाविकास आणि बहुजन आघाडीची कोणाशी युती होते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काही पक्षांशी वंचित बहुजन आघाडीची बोलणीही सुरू असल्याची माहिती समोर आली होती.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बैठक झाल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान आंबेडकर तिसऱ्या आघाडीसोबत जातील, अशा चर्चाही ऐकायला मिळाल्या. दुसरीकडे आता वंचित बहुजन आघाडीकडून 21 सप्टेंबर रोजी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभेप्रमाणेच आताही वंचित आघाडी ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र आज जाहीर करण्यात आलेल्या जागा सोडून नेमकी आघाडी होते की नाही, हे पहावे लागणार आहे.
उमेदवारांच्या नावापुढे जात !
लोकसभा निवडणुकीत वंचितकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत जातीचा उल्लेख करण्यात आला होता. आज पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीने आपल्या 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवाराच्या नावासमोर जातींचा उल्लेख करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेसाठीही आंबेडकर यांनी उमेदवाराच्या नावासमोर जातीचा उल्लेख केला आहे. निरनिराळ्या समाजातील लोकांना उमेदवारीची संधी देण्यात आली असल्याचं आंबेडकर यांनी म्हटलं होतं. ही नवी पद्धत असून याने राजकारणाची दिशा बदलू शकते, असंही आंबेडकर यांना वाटतं.
असे आहेत उमेदवार
रावेर : समीभा पाटील – तृतीयपंथी, लेवा पाटील
सिंदखेड राजा : सविता मुंडे – वंजारी
वाशीम : मेघा किरण डोंगरे – बुद्धिष्ट
धामणगाव रेल्वे : निलेश विश्वकर्मा – लोहार
नागपूर दक्षिण पश्चिम : विनय भांगे – बुद्धिष्ट
साकोली : डॉ अविनाश नान्हे – धिवर
नांदेड दक्षिण : फारूक अहमद – मुस्लिम
लोहा : शिव नारंगळे – लिंगायत
औरंगाबाद पश्चिम : विकास दांडगे – मराठा
शेवगाव : किसन चव्हाण – पारधी
कोल्हापूर : संग्राम माने – वडर