Akola Politics : कृषी खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले खत विकण्यास कृषी सेवा केंद्र आणि कृषी निविष्ठा केंद्र यांना मनाई करण्यात यावी, अशा आशयाची तक्रार वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्याकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून दाखल झालेली ही दुसरी तक्रार आहे.
कृषी खंताच्या पेात्यांवर पंतप्रधान यांचा फोटो असल्यामुळे कृषी विक्रेत्यांना खत विकताना आदर्श आचारसंहिता भंग करू नये म्हणून त्यांनी ‘स्टिकर्स’ लावून खत विक्री करावी अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडीचेवतीने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल. त्यामुळे खत विक्री करताना निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही, असे आदेश विक्रेत्यांना, अधिकारी, कर्मचाऱ्यांना देण्यात यावे. अशी मागणी करण्यात आली होती. त्यामुळे पोत्यांवरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोवर ‘स्टिकर’ लावून खतांची विक्री करावी, असे निर्देश अमरावती कृषी अधीक्षक कार्यालयातून सर्व कृषि विक्रेत्यांना देण्यात आले आहेत.
केंद्र सरकारच्या खत विभागाने देशात भारत या एकाच नावाखाली विविध खतांचा पुरवठा करण्याच्या सूचना खत कंपन्यांना दिल्या. त्यानुसार मागील वर्षीपासून खंताच्या कंपन्यांकडून भारत नावाखाली खतांचा पुरवठा होत आहे. खतांच्या पोत्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यावर आयोगाने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र काढून कोणत्याही राजकीय पक्षाचे फोटो तसेच राजकीय नेत्यांचे फोटो अथवा मतदारांवर प्रभाव पडेल असा मजकूर असल्यास त्यावर ‘स्टिकर’ लावून संबधित वस्तू किंवा खतांच्या पोत्यांची विक्री करावी असे आदेश काढले आहेत. या आदेशांचे व निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे.