Election Commission Of India : अकोला येथे लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू असताना वंचित बहुजन आघाडीने आता एका मोटर कंपनीविरुद्ध तक्रार केली आहे. या कंपनीकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आल्यानंतर ‘वंचित’ने ऑनलाइन तक्रार दाखल केली आहे. भारतीय सशस्त्र दलाचे नाव छायाचित्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोचा वापर करीत आत्मनिर्भर भारतची अशा आशयाची ही जाहिरात आहे. हा प्रकार आदर्श आचारसंहिता भंग करणारा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला आहे.
वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी ‘सी व्हिझिल’वर ही तक्रार दाखल करीत कारवाईची मागणी केली आहे.आदर्श आचारसंहिता असताना सैन्य दलाच्या छायाचित्र आणि नाव वापरून कोणतीही जाहिरात प्रकाशित करता येत नाही. त्यानंतरही संबंधित मोटर कंपनीकडून जाहिराती प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीमधील ‘आत्मनिर्भर भारत’ हे भाजपकडून प्रचारासाठी वापरण्यात आलेले घोषवाक्य आहे. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे छायाचित्र देखील आहे. जाहिरातीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्यात आले आहे. त्यामुळे थेट प्रचार होत असल्याचे ‘वंचित’ने तक्रारीत म्हटले आहे.
काय म्हटले आहे तक्रारीत?
मोटर कंपनी भारतीय सशस्त्र दलासाठी खास विकसित केलेल्या ‘लाइट स्ट्राइक व्हेइकल’चा (एलएसव्ही) पुरवठा करते. त्यामुळे या कंपनीचा सरकारी यंत्रणेशी संपर्क येतो. अशात निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना अशी जाहिरात देणे हा गंभीर प्रकार असल्याचे पातोडे यांनी नमूद केले आहे. संबंधित खासगी कंपनीने केवळ वाहन पुरवठा केला म्हणून निवडणूक काळात पंतप्रधन मोदी यांचा प्रचार करण्यासाठी अशी जाहिरात देणे चुकरचे असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या निष्पक्षतेवर हा प्रकार प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी जाहीर केल्यानुसार 90 मिनिटात कारवाई करून संबंधित कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अपेक्षा देखील वंचित युवा आघाडीच्यावतीने व्यक्त करण्यात आली आहे.
निवडणूक काळात राजकीय पक्षांना प्रचारासाठी काही बंधन घालून देण्यात आले आहेत. आमचा कोणत्याही खासगी कंपनीला विरोध नाही. परंतु अशा प्रकारे आचारसंहितेच्या काळात कोणाचा उदोउदो करणे हा आचारसंहितेचा भंगच आहे.
– राजेंद्र पातोडे