Maharashtra Politics : प्रचंड मेहनत करून देखील महाराष्ट्राने वंचित बहुजन आघाडीकडे पाठ फिरवली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासह वंचितला कुठेही आघाडी घेता आली नाही. त्यामुळे विजय मिळविणे तर दूरच राहिले आहे. अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढली. त्यांचा सामना थेट भाजप आणि काँग्रेसशी होता. अखेरच्या क्षणापर्यंत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी जोरकस प्रयत्न करत होती. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
महाविकास आघाडीने अखेरच्या क्षणी पाठ फिरवली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र वंचित बहुजन आघाडीचे हे स्वबळ कमी पडल्याचे दिसत आहे. अकोला लोकसभा मतदारसंघासह वंचित बहुजन आघाडीला कुठेही ‘कमाल’ दाखवता आला नाही. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने वंचित बहुजन आघाडीला नाकारल्याचे चित्र आहे.
अकोल्यात माघार
अकोला लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकर यांची लढत महत्त्वपूर्ण होती. मात्र मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच आंबेडकर तिसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजपचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसचे अभय पाटील यांच्यातच आघाडीचा लपंडाव सुरू होता. पुणे, बीड, धाराशिव, परभणी येथील उमेदवारांनी जोरकस प्रयत्न केले. परंतु त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांना ‘ओव्हरटेक’ करता आले नाही. प्रकाश आंबेडकर यांच्यासह पंजाब डख, वसंत मोरे, भाऊसाहेब आंधळकर, अशोक हिंगे, उत्कर्षा रुपवते हे देखील मतांच्या रेसमध्ये फार धावू शकले नाहीत.
Sharad Pawar : एक-दोन दिवस थांबा, शरद पवारांचं मोठं वक्तव्य !
चित्र वेगळे असते
महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला शेवटपर्यंत खेळवत ठेवले. प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार मैत्रीचा हात पुढे केला. परंतु महाविकास आघाडीने त्यांच्या मनातील शेवटपर्यंत पुढे येऊच दिले नाही. त्यामुळेच प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेतले असते, तर चित्र कदाचित वेगळे राहिले असते.
पराभवाचे खापर
निवडणुकीतील पराभवाचे खापर काही पक्ष वंचित बहुजन आघाडीवर फोडतात. अकोल्यामध्ये झालेले तिहेरी लढत पाहता हे पुन्हा एकदा होऊ शकते. अकोल्यात प्रकाश आंबेडकर आणि अभय पाटील यांच्या मतांची बेरीज असलेली मतं अनुप धोत्रे यांना गेली. त्यामुळे येथे पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीवर वाताहात केल्याचे खापर फुटण्याची शक्यता आहे.