Prakash Ambedkar : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अखेर वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी ही अकोल्यात घोषणा केली आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करून काही निर्णय घेतल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीबाबत बोलणे यावेळी आंबेडकर यांनी टाळले. त्यामुळे महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील बोलणी अद्यापही सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. वंचित आणि महाविकास आघाडी यांच्यात आघाडी झाली की बिघाडी याबाबत आंबेडकर माहिती देतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आंबेडकर यांनी या विषयावर काहीच न बोलता मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेतून काही निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीत महत्वाची चर्चा
आंबेडकर म्हणाले, आम्ही महाविकास आघाडीला म्हणालो होतो की, जरांगे पाटील हा ‘फॅक्टर’ लक्षात घेतला पाहिजे. पण दुर्दैवाने तो ‘फॅक्टर’ त्यांनी लक्षात घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची आपण आणि किसन चव्हाण यांच्यासोबत बैठक झाली. दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसंदर्भातील चर्चा 31 मार्च, 1 आणि 2 एप्रिलला पूर्ण करायचा निर्णय झाला. शेतकरी आणि बेरोजगारांचा प्रश्नाला प्राधान्य कसे द्यायचे. ग्रामीण भागातून उद्योजक, व्यवसाय कसे वाढवता येतील यासंदर्भात चर्चा झाली. ओबीसी समाजाला लोकसभेमध्ये एक किंवा दोन व्यक्ती सोडले तर गेल्या 70 वर्षांमध्ये प्रतिनिधीत्व दिले गेलेले नाही. त्यामुळे यावेळेस ओबीसी, भटके विमुक्त हा ‘फॅक्टर’ लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचे ठरले.
मुस्लिमांचे खच्चीकरण रोखणार
भाजपने जे मुस्लिमांचे खच्चीकरण सुरू केले आहे. त्याला थांबविण्यासाठी लोकसभेमध्ये मुस्लिम उमेदवारसुद्धा देणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. जैन समाजाचासुद्धा उमेदवार देण्यात येणार आहे. या उमेदवारांना जिंकून आणण्यासाठी काम करण्यात येणार आहे. वंचित, गरीब मराठा, मुस्लिम, इतर समाज याला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा असल्याचे आंबेडकर म्हणाले. राजकारण आणि निवडणुकीत प्रचंड पैसा खर्च केला जातो. अशात निवडणूक आयोगाने नेमून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेच्या आतमध्ये किंवा त्याच्यापेक्षा अर्ध्या खर्चामध्ये या निवडणूक लढविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मैदानात उतरलेले उमदेवार
‘वंचित’च्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. अकोला येथुन प्रकाश आंबेडकर लढणार आहे. भंडारा-गोंदियातून संजय गजानन केवट, गडचिरोली-चिमूरमधून हितेश पांडूरंग मडावी, चंद्रपुरातून राजेश वारलू बेले, बुलढाण्यातून वसंत मगर, वर्धा मतदारसंघातून राजेंद्र साळुंखे, यवतमाळ-वाशिममधून सुभाष पवार,
अमरावतीमधून प्राजक्ता पिल्लेवाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमध्ये ‘वंचित’काँग्रेसला पाठिंबा देणार आहे. सांगलीत प्रकाश शेंडगे यांना मदत करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.