Assembly Election : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे वयाने मोठे आहेत. ते केंद्रीय मंत्री देखील होते. त्यामुळं त्यांचा आपण सन्मानच करतो. परंतु ते विनाकारण आपला राग करीत आहेत. आपण सत्य जगापुढं आणलं आहे. त्यामुळं खरं तर खर्गे यांनी आपले आभार व्यक्त करण्याची गरज आहे, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं. ते नागपुरात आयोजित प्रचार सभेत बोलत होते. व्यासपीठावर महाराष्ट्र प्रदेश भाजपचे अध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके, आमदार मोहन मते, बंटी कुकडे आदी उपस्थित होते.
काय म्हणाले असे योगी
योगी म्हणाले की, मल्लिकार्जून खरगे यांच्या गावावर हैद्राबादच्या निझामाच्या रझाकारांनी हल्ला करून हिंदूंची कत्तल केली होती. त्यात त्यांच्या आई, बहीण आणि अनेक नातेवाईकांना प्राण गमवावे लागले. मात्र आता मुस्लीम नाराज होतील, रझाकारांचे नाव आता खर्गे घेत नाहीत. काँग्रेसचे अध्यक्ष रझाकारांच्या अत्याचाराविषयी का बोलत नाहीत, असा सवाल योगी आदित्यनाथ यांनी केला. निझामाच्या मुद्द्यावर खर्गे कधीच बोलणार नाही, असं योगी म्हणाले.
नागपुरातही हिंदुत्वाचा मुद्दा
योगी आदित्यनाथ यांनी आतापर्यंतच्या सगळ्याच सभांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रखर भाषण केले. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा एकच मुद्दा त्यांच्या सर्वच भाषणात होता. गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक, लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद हेच मुद्दे योगी नागपुरातही बोलले. काँग्रेस कसं मुस्लीमांचं तुष्टीकरण करीत आहे हेच योगी प्रत्येक भाषणात सांगताना दिसत आहे. जे भाषण योगी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या सभेत केलं, तेच ते भाषण योगी पुन्हा पुन्हा करताना दिसत आहे.
काँग्रेसचा असा विश्वासघात
जातीच्या नावावर वाटणाऱ्या काँग्रेसने 1947 पासून देशासोबत विश्वासघात केला. काँग्रेसचे अस्तित्व आता संपवण्याची वेळ आली आहे, असा हल्लाबोल योगी यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आता नवीन भारताच्या सीमा सुरक्षित आहेत. 500 वर्षांत जे कार्य झाले नाही, ते नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर उभारून झाले. हे डबल इंजिन सरकारचा लाभ आहेत. सर्व समस्यांचे समाधान केवळ डबल इंजिन सरकार असू शकते, असे देखील योगी म्हणाले. डबल इंजिन सरकारच महाराष्ट्रातील ‘बेटी, रोटी आणि माटी’ची रक्षा करू शकेल. त्यामुळं लोकांनी विचारपूर्वक मतदान करावं असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केलं. योगींच्या सभेत भाजपच्या कार्यकर्त्यांचा जोशी दिसून आला.