महाराष्ट्र

Devendra Fadnavis : वाघनखांचा वापर बुद्धीवरची बुरशी काढायला!

Satara : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना टोला

आपल्याला कुणाचा कोथळा काढायचा नाही. पण काहींच्या बुद्धीवर बुरशी चढली आहे. ही बुरशी वाघनखांच्या सहाय्याने काढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच ते काम करतील असा विश्वास आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. 

शुक्रवारी (ता. 19) सातारा येथे शस्त्रांच्या कवायतीसह ‛शिवशस्त्रशौर्यगाथा’ हा दिमाखदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत वाघनखं दर्शनासाठी खुली करण्यात आली.

यावेळी फडणवीसांनी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि त्यांच्या विभागाचे कौतुक केले. तसेच अजित पवार यांनी देखील आजचा दिवस जनतेला दाखवण्यासाठी कष्ट घेतले, याचा त्यांनी उल्लेख केला. 

उपमुख्यमंत्री म्हणाले, आजचा क्षण अतिशय आनंदाचा आणि ऐतिहासिक आहे. शिवरायांनी वाघनखांचा वापर करत औरंगजेब याचा सरदार असलेल्या अफजलखान याचा कोथळा बाहेर काढला. तो चित्तथरारक प्रसंग पिढ्यानुपिढ्या आपण ऐकत आलोय.

त्यातील प्रमुख शस्त्र असलेली वाघनखं लंडनला होती. ती आज महाराष्ट्रात आली. खऱ्या अर्थाने ऐतिहासिक राजधानी साताऱ्यात आली आहेत. ती आता दर्शनासाठी उपलब्ध झाली, यापेक्षा मोठं भाग्य आपलं असूच शकत नाही. महाराजांशी जुळण्याची संधी आपल्याला मिळाली आहे,

शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंनी विनंती केली की, वाद करू नका. पण आपल्या देशात काही लोकांचा उठसूठ एकच धंदा आहे. हा रोग आजचा नाही. या रोगाचा सामना महाराजांनाही करावा लागला होता.

त्यांनी सर्व शंकांचे निरसन करून रयतेचं राज्य आणून दाखवलं, असंही ते म्हणाले. मुगलांचे अत्याचार कधी संपणारच नाही असे वाटत असताना महाराजांनी जिजाऊंच्या प्रेरणेने तलवार हाती घेतली. अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र केले. पौरुष्य जागृत करून रयतेचे राज्य स्थापन केले. आपण प्रभू श्रीरामांना युगप्रवर्तक म्हणतो.

Sudhir Mungantiwar : देशाचे तुकडे करण्याचा विचार कराल तर याद राखा

महाराज देखील युगप्रवर्तक आहेत. कारण त्यांनी जुलमी युग बदलवलं. महाराजांनी सामान्य माणसाला एकत्र केलं. त्यांना समजावलं की, मुगलांची तागद मोठी आहे. पण ती ताकद संपवण्याचे बळ तुमच्यात आहे. मग मावळे तयार झाले. महाराजांनी त्यांना प्रेरणा दिली. ३५० वर्ष झाले, तरीही महाराजांचे नाव घेतल्यावर प्रत्येकाचं रक्तामध्ये ऊर्जा संचारते. हीच छत्रपतींची किमया आहे, असंही ते म्हणाले.

छत्रपतींच्या इतिहासाशी जुळण्याची संधी मिळाली तर ती सोडता कामा नये. त्यांच्या शौर्याचे प्रतिक असलेली हे वाघनखं आहेत. राज्यातला प्रत्येक माणूस दर्शन घेईल, असेही ते म्हणाले.

शिंदे, मुनगंटीवारांचे अभिनंदन

मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वात अनेक चांगली कामे चालली आहे. अजित दादांनी अनेक गोष्टी सांगितल्या त्या पुन्हा सांगायची गरज नाही. महाराजांनी शेवटच्या माणसाचा विचार केला.

त्यांनी भेदभाव केला नाही. हे राज्यदेखील भेदभाव न करता शेवटच्या माणसाचा विचार करतं, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार व त्यांच्या विभागाचेही कौतुक केले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!