Political Campaign : लोकसभा 2024 मधील प्रचाराची रणधुमाळी सध्या शिगेला पोहोचली आहे. उमेदवाराचा माहोल सर्वसामान्यांमध्ये तयार करण्यासाठी ‘डिजिटल इन्फ्लुएंसर’ कार्यकर्त्यांना सध्या चांगलीच डिमांड आली आहे. त्यासाठी उमेदवार पैसे सुद्धा मोजायला तयार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर झालेल्या विविध निवडणूक व चळवळींमध्ये राजकीय कार्यकर्ते आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून एखाद्या पक्षाच्या विचारधारेसाठी
काम करायला लागले. पूर्वी कार्यकर्ते कटिबद्ध राहून काम करत. वेळप्रसंगी ते आपल्या खिशातले सुद्धा पैसे उमेदवारासाठी खर्च करायचे. आम्ही खस्ता खाऊन पक्षाचा प्रचार केला असे वाक्यप्रचार आताही जुने लोक सांगतात. देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अनेक ‘क्लिप’ समाज माध्यमांवर व्हायरल होत असतात. त्यामध्ये त्यांनी सुरुवातीच्या काळात कशा पद्धतीने काम केले ते सांगतात.
गडकरींची धावपळ
विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्ता असताना आम्ही सायकलवर फिरून पक्षासाठी काम केले. भिंतीवर कमळाचे चिन्ह काढून मत मागितले. येणाऱ्या नेत्यांसाठी स्वतः पाण्याचा ग्लास घेऊन समोर धावल्याचे अनेक किस्से नितीन गडकरी व त्या फळीतील नेते सांगत असतात. मात्र आता काळ बदलल्याचे दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञान व माहितीच्या काळात कार्यकर्ते सुद्धा ‘हायटेक’ झाल्याचे चिन्ह प्रचारात दिसून येत आहे. हातात दोन स्मार्टफोन, कानात इयरफोन, स्मार्ट वॉच आणि हे सगळे डिजिटल उपकरण एकमेकाला कनेक्ट अशी सध्या राजकीय कार्यकर्त्यांचे चित्र आहे.
राजकीय नेते सुद्धा आपल्या प्रचार यात्रा व प्रचार सभांमध्ये डिजिटल कार्यकर्त्यांची अख्खी फळीच घेऊन मैदानात उतरले आहेत. सातत्याने फेसबुक लाई
इव्ह करणे त्याची कनेक्टिव्हिटी यूट्यूबसोबत असणे. कार्यक्रम झाल्यानंतर काही क्षणात त्याची रिल्स व्हायरल होत आहेत. लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना ते रील्स स्टेटस म्हणून वापरण्याची विनंती करणे अशी सध्या वेगवेगळ्या ट्रिक्स राजकारणात वापरल्या जात आहे.
या सगळ्या गोष्टी करण्यासाठी राजकीय नेत्यांना मोठ्या प्रमाणात डिजिटल स्किल असलेल्या कार्यकर्त्यांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह विविध लहान-मोठे पक्ष सुद्धा मोठी रक्कम मोजण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे 2024 मधील निवडणुकीतला प्रचाराचा हा ‘डिजिटल व हायटेक फ्लेवर’ सध्या चर्चेच्या मध्यभागी आहे.