Scam In Exam : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची निवड रद्द करण्यात आली आहे. भविष्यातील सर्व परीक्षांना बसण्यासही पुजाला बंदी घालण्यात आली आहे. पुजाने स्वत:च्या, वडिलांच्या नावात बदल करून परीक्षा दिली. आईच्या नावातही बदल केला. लोकसेवा आयोगाला चौकशीत हा प्रकार आढळला. परीक्षेचा फॉर्म भरताना पुजाने फोटो, सही, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता या सगळ्यात जाणीवपूर्वक बदल केला होता.
संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्यासाठी जास्तीत जास्त मर्यादा ठरवून देण्यात आली आहे. ही मर्यादा पुजाने केव्हाच ओलांडली होती. मात्र सगळ्यात तपशिलात बदल करून पुजाने युपीएससीलाही शेंडी लावल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता पुजाची निवड रद्द करण्यात आली आहे. 18 जुलै 2024 रोजी पुजाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र तिने त्याला उत्तर दिले नाही. 34 वर्षीय पुजाला 25 जुलैपर्यंत नोटीसला उत्तर देण्याची मुदत देण्यात आली होती. परंतु तिने 4 ऑगस्टपर्यंत वेळ देण्याची विनंती केली.
सगळीच बनवेगिरी
युपीएससीने पुजाला उत्तर देण्यासाठी 30 जुलैपर्यंत वेळ दिला. यात अंतिम संधी असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र पुजाने कोणतेही स्पष्टीकरण सादर केले नाही. चौकशीत युपीएससीने पुजाच्या आतापर्यंतच्या सर्व नोंदी काळजीपूर्वक तपासल्या. त्यानुसार तिची उमेदवारीच रद्द करण्यात आली. पुजामुळे 2009 पासून 2023 पर्यंत आयएएस करणाऱ्या 15 हजारापेक्षा अधिक उमेदवारांच्या डाटाची तपासणीही केली. मात्र त्यात गैरप्रकार आढळला नाही. पुजाने मात्र सगळीच बनवेगिरी केल्याचे उघडकीस आले. युपीएससीने तिची उमेदवारी रद्द करण्यापूर्वी महाराष्ट्र सरकारने तिच्या नेमणुकीला स्थगिती दिली होती.
विदर्भातील वाशिम येथे (Washim) कार्यरत असलेल्या पुजाला कार्यमुक्त करून लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी येथे जाण्यास सांगितले होते. मात्र ती गायब झाली. वाशिमध्ये असताना तिने पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात छळ केल्याची तक्रारही पोलिसांकडे केली. मात्र अखेर पुजानेच बनवेगिरी केल्याचे युपीएससीच्या आदेशावरून दिसत आहे. पूजा खेडकर यांच्या प्रकरणात चौकशीसाठी केंद्र सरकारनं एका समितीची स्थापना केली होती. या समितीने पुजाशी संबंधित सर्व बाबींची बारकाईने तपासणी केली.
पूजा दिलीप खेडकरचे वडिल दिलीप हे देखील महसूल सेवेत होते. 2023 मध्ये आयएएस केल्यानंतर पूजाला पुण्यात (Pune) परीविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक मिळाली. पण बनवेगिरी करून मिळविलेले पदही पूजाला टिकवता आले नाही. प्रशिक्षणाच्या काळातच पुजाने अनेक प्रताप केले. पुण्याला रुजू होण्यापूर्वीच पुजाने अनेक मागण्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांना मॅसेज पाठवत तिने असुविधांबद्दल तक्रार केली. एका महिला अधिकाऱ्याच्या केबीनवरही तिने ताबा मिळविला. अधिकाऱ्यांशी मुजोरी केली. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन लिहिले. त्यावर अंबर दिवा लावला. या कारवर नंतर पुणे पोलिसांनी वाहतुकीचे अनेक नियम मोडल्याचे मोठा दंडही वसूल केला. विशेष म्हणजे ही कार पुजाची नसून भलत्याच कंपनीची होती.
बाबांना सांगितले केबिन नाही
नियमाप्रमाणे पुण्यात पूजा खेडकर यांची चौथ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र आयएएस अधिकार असल्याने तिला अटॅच्ड बाथरूम कक्ष हवा होता. त्यानंतर वडिलांबरोबर त्यांनी व्हीआयपी सभागृहात जागा शोधली. तिथे इलेक्ट्रिक फिटिंग नव्हते. त्यानंतर पुजाच्या वडिलांनीच निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी वाद घातला. जणु काही आपली मुलगी शाळेत जात असल्याप्रमाणे त्यांची वागणूक होती, असे आता पुण्यातील अधिकारी सांगतात. त्यांनतर पुजाची बसण्याची व्यवस्था अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अॅन्टी चेंबरमध्ये करण्यात आली. पुजाने या कक्षातील सर्व साहित्य काढत स्वत:च्या नावाचा बोर्डही लावा. लेटरहेड, व्हिजिटिंग कार्ड, राजमुद्रा असे सारेकाही मागितले.
महसूल विभागात हा प्रकार सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्ववत करण्याचा आदेश दिला. त्यामुळे पुजाने दिवसे यांनाच थेट मॅसेज केला. तुम्ही जर या चेंबरमधून बाहेर काढलं तर माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो मला सहन करणे शक्य होणार नाही, असे तिने लिहिले होते. हे प्रकार वाढत केल्याने दिवसे यांनी राज्य सरकारने यासंदर्भात अहवाल पाठवला. त्यानंतर पुजाला वाशिमला पाठविण्यात आले. अहवाल मंत्रालयात जाताच पुजा खेडकर प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू झाली.
Pooja Khedkar. : ‘सरकारने मला बोलण्याची परवानगी दिलेली नाही’
पुजाने 2022 मध्ये अपंग प्रमाणपत्र मिळविले होते. 2021 मध्ये तिची स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) या संस्थेत त्यांची सहायक संचालक या पदावर नियुक्ती झाली होती. 2021 मध्येही तिने बहुविकलांगता प्रवर्गातून नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती. पुजाचे वडिल दिलीप हे देखील सरकारमध्ये अधिकारी होते. पुजाच्या आईचे वडिल जगन्नाथ बुधवंत हे वंजारी समाजातून सनदी अधिकारी झालेले पहिले व्यक्ती होते. मात्र पुजाला झाकली मूठ सव्वालाखाची याप्रमाणे काम करता आले नाही, अशी चर्चा आता राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये आहे.