Sessions of Parliament : संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक संबोधल्याचा आरोप करून सत्ताधाऱ्यांनी मोठा गदारोळ केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनींही राहुल गांधींच्या विरोधी पक्षाच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. राहुल गांधी बोलत असताना अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी मधेच उभे राहिले आणि म्हणाले की, हिंदू समाजाला हिंसक म्हणणे चुकीचे आहे. यावरून राहुल गांधी पुन्हा भडकले.
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या संसद अधिवेशनाचा सोमवारी (ता. 1 जुलै) सहावा दिवस होता. विरोधकांनी पुन्हा एकदा संसदेत गोंधळ घातला. लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘स्वतःला हिंदू म्हणवणारे फक्त हिंसा, द्वेष पसरवतात आणि खोटे बोलतात’, असे ते म्हणाले. राहुल गांधींच्या या वक्तव्याचा सत्ताधारी पक्षाने निषेध व्यक्त केला आहे.
सोमवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होत होती. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधानाची प्रत हातात घेऊन चर्चेला सुरुवात केली आणि संविधानाच्या नावाखाली मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
इतकेच नाही तर चर्चेदरम्यान राहुल यांनी असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक उभे राहून आपला निषेध व्यक्त करत संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे ही गंभीर बाब असल्याचे म्हटले.
काय म्हणाले राहुल गांधी ?
चर्चेदरम्यान राहुल गांधी संसदेत म्हणाले, ‘मोदीजींनी एके दिवशी आपल्या भाषणात सांगितले की, भारताने कधीही कोणावरही हल्ला केला नाही. याचे कारण भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी हा संदेश दिला घाबरू नका, घाबरू नका. शिवजी म्हणतात घाबरू नका, घाबरू नका आणि त्रिशूळ जमिनीत गाडून टाका.
स्वत:ला हिंदू म्हणवणारे चोवीस तास हिंसा-हिंसा आणि द्वेषात गुंतलेले असतात. यानंतर संसद भवनात गदारोळ झाला. राहुल गांधी म्हणाले, ‘हिंदू धर्मात स्पष्टपणे लिहिले आहे की, सत्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, सत्याला घाबरू नये, सत्य हे आपले प्रतीक आहे.’ यानंतर पीएम मोदी अचानक उभे राहिले आणि म्हणले की, ‘हा विषय अतिशय गंभीर आहे, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे हा गंभीर विषय आहे.’