महाराष्ट्र

Nagpur : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात गडकरींचे कौतुक

Assembly Election : विकासकामे ऐकवली; मग म्हणे काँग्रेसला मतदान करा

Nitin Gadkari : लोकसभा निवडणुकीत नागपुरात काँग्रेसच्या मोठमोठ्या सभा झाल्या. प्रत्येक सभेत पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवण्यात आला. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका करणे टाळले गेले. प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात न बोलता प्रचार झाला, कारण प्रतिस्पर्धी गडकरी होते. आता विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने त्याच्याही पुढे एक पाऊल टाकले आहे. ठाकरे गटाच्या नेत्याने काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारात गडकरींचे भरभरून कौतुक केले.

नागपुरातच नव्हे तर संपूर्ण देशात नितीन गडकरी त्यांच्या कार्यपद्धतीसाठी लोकप्रिय आहेत. देशभरात महामार्गांचे जाळे विणणे असो किंवा पायाभूत सुविधा निर्माण करणे असो. गडकरींचे योगदान कुणीही टाळू शकत नाही. बहुधा सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे देखील त्यांचे कौतुक करण्याची एकही संधी सोडत नाहीत. देशात इंडिया आघाडीची स्थापना झाली तेव्हा तर कहरच झाला. आघाडीच्या पहिल्याच बैठकीत ‘गडकरींवर टीका करायची नाही’, असा ठरावच करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसने गडकरींचे कौतुक करून जणू ठरावाची अंमलबजावणीच केली आहे. मध्य नागपुरात प्रवीण दटके भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांपूर्वी गडकरींची सभा झाली. त्यावेळी त्यांनी ‘काँग्रेस नेत्यांना साठ वर्षांचा हिशेब मागा’, असे आवाहन मतदारांना केले होते. मात्र, बुधवारी काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारात ठाकरे गटाच्या एका नेत्याने गडकरींनी कसा विकास केला हेच सांगितले.

संघर्षाचा मार्ग विकासापर्यंत

‘गडकरींचे नेतृत्व संघर्षातून पुढे आले. गडकरींनी चांगल्या कामाच्या जोरावर देशात लौकीक प्राप्त केला,’ अशी सुरुवात ठाकरे गटाचे शहर प्रमुख नितीन तिवारी यांनी केली. महाविकास आघाडीच्या मंचावरून त्यांनी गडकरींचे कौतुक केल्यामुळे अनेक लोक बुचकाळ्यात पडले. त्यानंतर त्यांनी प्रवीण दटके सध्या विधानपरिषदेत सदस्य आहेत, त्यामुळे बंटी शेळके यांना विजयी करा, असे आवाहन मतदारांना केले. पण गडकरींचे कौतुक करून काँग्रेससाठी मत मागण्याचा प्रकार मतदारांसाठी नवीन होता.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!