The story of the plane : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गुरुवारी (दि.7 नोवहेंबर) सकाळी दिल्लीहून नागपूरला येत होते. दिल्लीहून निघालेले विमान नागपूरला पोहोचेपर्यंत त्यांच्यासोबत असे काही घडले की त्याचे वर्णन करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. विशेष म्हणजे त्यानंतर नागपूर विमानतळावर विरोधी पक्षाच्या उमेदवारानेच त्यांचे स्वागत केले आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला.
नितीन गडकरी यांच्या रोज किमान तीन सभा सुरू आहेत. आतापर्यंत नागपुरात सहा सभा त्यांनी घेतल्या. शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केले. आता आठवडाभरात संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या 50 हून अधिक सभा होणार आहेत. अशात गुरुवारी सकाळी ते दिल्लीहून नागपूरला निघाले. ‘विमान प्रवास करताना मी एकतर गाणी ऐकतो किंवा शांत झोप घेतो’, असं ते नेहमी भाषणांमधून सांगत असतात. पण गुरुवारी घडलेला प्रसंग झोप उडवणारा ठरला.
अरे देवा..
‘विमान हवेत असताना काही प्रवासी जागेवरून उठले आणि माझ्याकडे फोटोसाठी आग्रह करू लागले. मी त्यांना काही नाराज केले नाही. पण एकामागोमाग एक लोक येत होते. त्यामुळे एअरहोस्टेटने त्यांना राखले आणि अनाऊन्समेंट करून जागेवर बसायला सांगितले. त्यानंतर थोड्यावेळाने स्वतः दोन्ही एअरहोस्टेस ‘आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे’, असं म्हणाल्या. एवढ्यावर विषय थांबला नाही. एक पायलट बाहेर आला आणि त्यानेही फोटो काढला. मी घाबरलो. म्हटलं आत कुणी आहे की नाही?. एक पायलट आत गेल्यावर दुसरा बाहेर आला आणि त्यानेही फोटो काढू देण्याची विनंती केली. हे सारं विमान हवेत सुरू असताना घडत होतं,’ असं गडकरींनी भाषणात सांगितलं. त्यानंतर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला
विरोधी पक्षाचा तो उमेदवार कोण?
‘त्यानंतर नागपूर विमानतळावर पोहोचलो तेव्हा तिथे एका विरोधी पक्षातील नेत्याच्या स्वागतासाठी त्यांचा उमेदवार व कार्यकर्ते जमले होते. त्यांनी मला बघितले आणि माझेच स्वागत करायला लागले. तो उमेदवार तर माझ्या जवळ आला आणि फोटोसाठी आग्रह करू लागला. ‘निवडणुकीत या फोटोचा वापर करायचा नाही. नाहीतर आपण दोघेही अडचणीत येऊ’, असं मी त्याला गंमतीने म्हटलं,’ असं गडकरी म्हणाले. पण विरोधी पक्षाचा तो उमेदवार कोण, याबद्दल बोलण्याचे मात्र त्यांनी टाळले.