Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील ज्या मुद्द्यांवर विविध पक्षांचे एकमत होणार नाही, असे सगळे मुद्दे माझ्याकडे आणा. मी त्यावर योग्य तो उपाय करेन. शिवाय महाराष्ट्रात काही अडचण आलीच तर थेट माझ्याकडे या, असा सांगावा अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यादरम्यान राज्यातील महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना दिला आहे.
विधानसभेचे वारे
नवरात्रीनंतर लगेच विधानसभा निवडणूक होऊ घातलेली आहे . त्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते . त्यांनी घेतलेल्या बैठका पाहू जाता 3 आक्टोंबरपर्यंत राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढेच नव्हे तर किमान 50 उमेदवारांना व्यक्तिशः कामाला लागण्याचे निरोपसुद्धा येत्या पंधरा दिवसात दिले जातील, अशी माहिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. या दरम्यान त्यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यातील प्रमुख भाजप नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये ज्या जागांवर वाद होऊ शकतो, अशा जागा बाजूला ठेवा. ज्या ठिकाणी भाजप हमखास लढणार आहे, तेथील उमेदवारांची यादी जाहीर करा. त्यातील किमान 50 टक्के उमेदवारांना तयारीला लागण्याचे आदेश द्या. ज्यामुळे त्यांना पुरेसा वेळ मिळेल, अशी अपेक्षा एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. त्यावर बंडखोरीची शक्यता डोळ्यासमोर ठेवून असे न करता संबंधित उमेदवारांना थेट निरोप द्यावा, अशी भूमिका या बैठकीत घेतल्याचेही सूत्रांनी सांगितले.
Capital of Billionaires : चीनच्या बीजिंग शहराला मागे टाकत मुंबईने मिळविला मान
अजित पवारांना दिलासा..
महायुतीतील शिंदे गटाच्या आमदारांनी अजित पवार यांच्या संदर्भात टीका केली होती. त्या अनुषंगाने अजित पवार आता महायुतीचे घटक पक्ष म्हणून राहतील की नाही, अशी चर्चा सुरू झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मात्र अजित पवार यांना आपण सोबत आहे आणि सोबत राहणार, असे सांगत दिलासा दिला आहे.
विमानतळावरच झाली बैठक..
अमित शाह यांच्या दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या दौऱ्यात कुठेही झळकले नाहीत. परंतु अमित शाह यांनी थेट विमानतळावरच अजित पवार गटाच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे होते. ‘हम साथ साथ है’, असा संदेश शाह यांनी दिला.
साथ असणार
काही अडचण आलीच तर थेट माझ्याकडे या, असेही अमित शाह यांनी या नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच सुरू झालेल्या या दौरे आणि बैठकांमुळे आता निवडणुकीत रंग भरले जात आहेत. नवरात्रीपासून खऱ्या अर्थाने राजकीय दांडिया रंगायला लागेल, असे चित्र दिसते आहे.