Assembly Election : शाळा, कॉलेजमध्ये काही विद्यार्थी असे असतात की, ते वर्षभर अभ्यास करत नाहीत. टंगळमंगळ करतात आणि परीक्षा आली की कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेस – महाविकास आघाडीच्या नेत्यांचंही तसंच आहे. निवडून आल्यावर ते पाच वर्ष काहीच कामे करत नाहीत. पुन्हा निवडणूक आली की बकरे कापा, लोकांना मटण खाऊ खाला, निरनिराळी आमिष द्या आणि मत मिळवा, असले धंदे करतात. हे पूर्वी चाललं, पण आता अजिबात चालणार नाही. कारण मतदार राजा चोखंदळ झाला आहे, असे राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्ह्यात सभा
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची जाहीर सभा शुक्रवारी (15 नोव्हेंबर) चंद्रपुरात झाली. यावेळी मुनगंटीवार बोलत होते. त्यांनी काँग्रेस नेत्यांना चांगलेच धुतले. ते म्हणाले, काँग्रेसवाल्यांचे जुने धंदे आता चालणार नाहीत. महायुती ही मोठी शक्ती आहे. महायुतीमधील नेते हे दुसऱ्या पक्षांचे वाटतच नाहीत. तर महायुती हा एकच पक्ष वाटतो आहे. आमचे नेते प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेत आहेत. येणारं सरकार हे फक्त भाजपच नव्हे तर महायुतीचं सरकार असणार आहे.
या जिल्ह्याचा विकास आजवर महायुतीनेच केला. यापुढेही महायुतीच करेल. काँग्रेस हे काम कधीही करू शकणार नाही. ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’, या म्हणीप्रमाणे काँग्रेसवाले आता आम्हालाच प्रश्न विचारतात की, तुम्ही काय केले? आम्ही केलेल्या कामांची यादी त्यांना दिली. तर वाचता वाचता ते थकून जातील. त्यांच्याकडून वाचणंही होणार नाही. कारण ते तर कॉपी करणारे आहेत, असे म्हणत मुनगंटीवार यांनी पुन्हा काँग्रेस नेत्यांना टोला हाणला. अन् आम्ही आमची कामे त्यांना सांगितली तरी ते कानात बोळे टाकून घेतील, असेही ते म्हणाले.
Sudhir Mungantiwar : ‘बाहुबली’पुढे कसे टिकतील बल्लारपूरचे ‘भल्लालदेव’?
विकासकामे..
येथे ध्रुतराष्ट्रही आला तर त्याला विकास दिसेल आणि तोही म्हणेल की, ‘काँग्रेसवाल्यांनो मी आंधळा असूनही मला येथील विकास कामे दिसतात. तुम्ही काय माझ्यापेक्षाही आंधळे झालात काय?’ आम्ही इंजिनिअरींग कॉलेज, मेडीकल कॉलेज, बाबुपेठचा बगीचा, रेल्वे स्टेशन, बस स्टॅंड, रस्ते, समाज मंदिरे, कॅन्सर हॉस्पीटल, एसएडीटी युनिव्हर्सिटी, गोंडवाना विद्यापीठ, सर्वोत्तम सैनिक शाळा, बाबा आमटे अभ्यासिका, थ्री स्टार वन अकादमी, बांबू रिसर्च अॅंड ट्रेनिंग सेंटर सोमनाथमध्ये कृषी महाविद्यालय, वरोऱ्यात भाजीपाला संशोधन केंद्र, ई लायब्ररी, 12 हजार हेक्टरला पाणी देणारा चिचडोह प्रकल्प. 10 गावांसाठी पळसगाव-आमडी जलसिंचन प्रकल्प, चिंचाळाला सिंचनासाठी पाईपलाईन, अजयपूरमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, भंडारा व दिंडोरा प्रकल्प, 75 कोटींची इंडस्ट्री आणण्याचा करार, जिल्हा परिषद शाळा ई लर्निंग, 400 अंगणवाड्या आयएसओ अशी विकासकामांची लांबच्या लांब यादीच सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेसमोर मांडली. या कामांची जनता नक्की नोंद घेईल आणि आपल्यासोबत राहिल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.