Amit Shah Tour : केंद्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे. राज्यात महायुतीचं सरकार आहे. पुन्हा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आल्यास चंद्रपूरला नक्कीच खास पॅकेज मिळेल, असा विश्वास चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चंद्रपूर येथे महायुती उमदेवारांच्या प्रचारासाठी सभा घेतली. त्या सभेत आमदार जोरगेवार यांनी संवाद साधला. जोरगेवार हे चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत.
एक काळ होता जेव्हा चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली माओवादाच्या झळा सोसत होता. आता या जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलला आहे. गडचिरोलीचा कायापालट होत आहे. चंद्रपूरनं राज्यातील अनेक शहरांना विकासाच्या बाबतीत मागे टाकले आहे. माओवादाकडून संपन्नतेकडे चंद्रपूर जात आहे. महायुतीचं सरकार राज्यात आल्यास विकासाचा हा वेग चौपट होईल, असा विश्वासही किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.
शंभर टक्के विजय
चंद्रपूर जिल्ह्यात नवीन इतिहास घडणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सर्व सहाही उमेदवार विजयी होतील. महायुतीला शंभर टक्के विजय देणारा हा जिल्हा ठरेल, असंही जोरगेवार म्हणाले. महिलांच्या कल्याणासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना लागू केली. केवळ महायुतीचं सरकारच ही योजना ठामपणे चालवू शकते. सध्या या योजनेतून दीड हजार रुपये बहिणींना मिळत आहेत. भविष्यात महायुतीचं सरकार आल्यास ही रक्कम 2 हजार 100 रुपये होणार आहे. ही रक्कम तीन हजार रुपये करण्याचा मानस असल्याचंही जोरगेवार म्हणाले.
अत्याधुनिक सैनिक शाळा चंद्रपूरच्या वैभवात भर घालत आहे. तशाच प्रकारचं केंद्र तरुणाईसाठी तयार करण्याची मागणीही आमदार जोरगेवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडे केली. महायुतीचं सरकार आल्यास त्यासंदर्भातील प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल. पर्यटनाच्या दृष्टीनेही चंद्रपूर समृद्ध जिल्हा आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या दुसऱ्या दीक्षाभूमीचा विकासही होईल, असं आमदार जोरगेवार म्हणाले.
Amit Shah : त्यांनी कामं केली नाहीत, अन् आता बकरे कापत सुटले आहेत !
चंद्रपुरात मोठ्या प्रमाणावर खाण प्रकल्प आहे. त्यातून खाण पर्यटनाला चालना दिली जाऊ शकते. या भागात पर्यटन सर्किट तयार होऊ शकते. सहकार उद्योगाला चालना देण्याची मागणीही आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. या उद्योगातून शेतकऱ्यांना न्याय मिळेल. केंद्र आणि राज्य सरकारकडून चंद्रपूर जिल्ह्याला प्रचंड प्राधान्य देण्यात येत आहे. असाच विकास सुरू ठेवायचा असेल तर महायुतीशिवाय पर्याय नाही, असंही आमदार जोरगेवार म्हणाले.