Mahila Arthik Vikas Mahamandal Program : चंद्रपुरातील महिलांना आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ यासाठी काम करीत आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणावर तयार झालेले गणवेश पुरविण्यात येतात. परंतु यापुढे असे होणार नाही, यासाठी आपण राज्य सरकारकडे आग्रही भूमिका मांडणार आहो. चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या गावातील विद्यार्थी, त्याच गावातील महिला-भगिनींना गणवेश तयार करण्याचे काम द्यावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहे. राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा शब्द दिला.
चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर महिला आर्थिक विकास महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आजच्या घडीला वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गणवेश तयार केले जातात. हे गणवेश जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येतात. राज्यभरात अशाच पद्धतीने गणवेशाचा पुरवठा केला जातो. परंतु यापुढे मुंबई-पुण्यातील रेडीमेड गणवेश किमान चंद्रपूर जिल्ह्यात येऊ नये, अशी आपली भूमिका राहणार आहे. चंद्रपूर जिल्ह्याला लागणारे गणवेश चंद्रपुरातील शिवले जावे, अशी आपली भूमिका असेल. केवळ गणवेशांच्या बाबतीतच नव्हे तर अनेक उत्पादनांबाबतही आपण असेच आग्रही राहणार आहोत. चंद्रपुरातील प्रत्येक महिलेच्या हाताला काम देण्यासाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.
प्रत्येक महिलेला प्रशिक्षण
चंद्रपुरातील प्रत्येक महिलेला स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण देण्यात यावे, असे निर्देश आपण जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. भविष्यात चंद्रपूर जिल्ह्याला लागणाऱ्या गणवेशांचा पुरवठा करण्यासाठी याच जिल्ह्यात शिवणकामाची व्यवस्था व्हावी, असा आपला प्रयत्न राहणार आहे. लवकरच चंद्रपुरात महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचा सुसज्ज मॉल उभारण्यात येणार आहे. अशाच स्वरुपाच्या जागेत शिवणकामासाठीची व्यवस्था उपलब्ध करून देता येईल का, याची चाचपणी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमधून महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षण आणि शिलाई मशिन देखील उपलब्ध करून देता येऊ शकेल, असेही मुनगंटीवार यांनी नमूद केले.
महिलांना राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बसेसमधून सवलतीच्या दरात प्रवास उपलब्ध झाला आहे. लेक लाडकी योजना सुरू आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातूनही नारीशक्तीला आर्थिकदृष्टीने सक्षम केले जात आहे. चंद्रपुरातील अनेक बहिणींच्या बँकखाते आणि अधारसिडिंगबाबत आपण प्रक्रिया करून घेतली. देशाच्या प्रथम नागरीक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महिला आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही ‘नारी से नारायणी’ असे ध्येय डोळ्यापुढे ठेवले आहे. त्यामुळे आगामी काळात सक्षम भारताच्या निर्मितीत नारीशक्तीला प्रचंड महत्व राहणार आहे.
स्वयंरोजगाराच्या बाबतीत मागे राहू नये
चंद्रपुरातील आपली प्रत्येक माता, भगिनी सक्षम आणि स्वयंपूर्ण असावी, हे आपले स्वप्न आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी रोजगार, स्वयंरोगजाराच्या बाबतीत मागे राहू नये, असा आपला आग्रह असेल. लाडकी बहीण योजनेपासून चंद्रपुरातील एकही बहिण वंचित राहणार नाही, यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. महिलांनी देखील यासाठी पुढाकार घ्यावा, भाऊ म्हणून आपण प्रत्येक महिलेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची ग्वाही देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.