‘अजित पवार यांनी जिल्हा बँकेला मदत करण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यासोबत गेलो’. ‘अजितदादांनी जिल्हा बँकेला मदत केली आणि शब्द पाळला.’ ‘आजही शरद पवार हेच माझे प्रेरणास्थान’. ‘नाईलाजास्तव अजित पवारांसोबत गेलो’. ही सर्व विधाने गेल्या काही महिन्यांमध्ये एकाच व्यक्तीच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. आणि ती व्यक्ती आहे सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे. त्यांच्या या विरोधाभासी विधानांमुळे ‘शिंगणेजी, आखीर कहना क्या चाहते हों?’ हा एकच सवाल राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेचे वेध लागले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मातृतिर्थ सिंदखेडराजा मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने अनेक इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षापासून ज्यांचा एक छत्री अंमल राहिला आहे, ते आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे राजकीय संभ्रमाअवस्थेत दिसून येत आहेत. त्यांनी केलेली वेगवेगळी विधाने सतत चर्चेत असल्याने महायुतीसह महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार सुद्धा बुचकाळ्यात पडले आहेत.
जिल्हा सहकारी बँकेसाठी दादांसोबत
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर पारंपरिक मित्र असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती तुटली. राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने नवीन समीकरण उदयास आले. असे असताना शिवसेना पक्षाचा एक गट फुटल्यामुळे महाविकास आघाडी सरकार पडले आणि महायुतीचे सरकार आले. पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली. सुरुवातीला शरद पवार यांच्यासोबत असणारे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी काही दिवसातच घुमजाव केले. जिल्हा सहकारी बँकेसाठी आपण अजित पवार यांच्यासोबत जात असल्याची भूमिका जाहीर केली. महायुती सोबत सरकारमध्ये सहभागी होऊन सरकारकडून जिल्हा सहकारी बँकेला मदत देखील मिळवून घेतली.
असे असताना गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांचे कौतुक करण्याची एकही संधी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोडली नाही. अजित पवारांसह सारेच नेते शरद पवार आमचे प्रेरणास्थान आहेत, असे म्हणत असतात. पण शिंगणे यांच्या तोंडून येणारे कौतुक काहीसे संभ्रम निर्माण करणारे आहे. त्यामुळे नेमके ते महायुती सोबत आहेत, की महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार आहेत, याचा अंदाजच लावता येत नाहीये. त्यांच्या या विरोधाभासी भूमिकेमुळे मात्र दोन्ही बाजुंच्या इच्छुक उमेदवारांपुढे सध्या मोठा पेच निर्माण झाला आहे. आपण कोणती भूमिका घ्यावी, हेच त्यांना कळेनासे झाले आहे. याचबरोबर डॉ. राजेंद्र शिंगणे हे महाविकास आघाडीतसोबत जाणार की महायुतीमध्ये राहणार आहे, याबद्दल देखील मोठा संभ्रम सध्या मतदारसंघात निर्माण झाला आहे.
इच्छुकांची मोर्चे बांधणी सुरू
विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. अनेक इच्छुकांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. महायुतीकडून माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, माजी आमदार तोताराम कायंदे, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ, भारतीय जनता ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुनील कायंदे, युवा नेते योगेश जाधव तर महाविकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अशोक पडघान, अर्थतज्ञ डॉ. नरेश बोडके, राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्ष गायत्री शिंगणे, प्रमोद घोंगे, दिलीप वाघ यांनी सध्या मतदार संघात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे काय भूमिका घेतात, यावर राजकीय गणीतं अवलंबून आहेत. त्यांच्याच भूमिकेनंतर मतदारसंघातील राजकारणाची दिशा ठरणार आहे. नेहमीच धक्का तंत्राचा वापर करणारे डॉ. शिंगणे यावेळी कोणते राजकीय तंत्र वापरतात, याकडे राजकीय अभ्यासकांचे लक्ष लागले आहे.