Uddhav Thackeray : महाविकास आघाडीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत. येथील उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे मैदानात उतरले आहेत. येत्या 8 नोव्हेंबरला ते बुलढाणा जिल्ह्यात दाखल होणार आहेत. बुलढाणा व मेहकर येथे जाहीर सभा घेणार आहेत. ठाकरेंची दुपारी तीन वाजता बुलढाण्यात तर सायंकाळी पाच वाजता मेहकरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभांची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू आहे.
प्रचारार्थ..
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 7 व 8 नोव्हेंबर दोन दिवस आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पश्चिम विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. बुलढाणा येथे 8 नोव्हेंबर रोजी जयश्री शेळके यांच्या प्रचारार्थ दुपारी तीन वाजता तर मेहकरचे उमेदवार सिध्दार्थ खरात यांच्या प्रचारार्थ सायंकाळी पाच वाजता सभा आयोजित केल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 5 नोव्हेंबर रोजी प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शन घेऊन करतील. पश्चिम विदर्भात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी 7 व 8 नोव्हेंबर दोन दिवस प्रचाराचा झंझावात राहणार असून 7 नोव्हेंबर दुपारी 1 वाजता दर्यापूर विधानसभा, तीन वाजता तिवसा विधानसभा, सायंकाळी 4 वाजता बडनेरा विधानसभा तर सायंकाळी 7 वाजता नितीन देशमुख यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.
जयश्री शेळके..
बुलढाणा जिल्ह्यातील साडेतीन दशकांच्या राजकीय प्रवासात शिवसेनेने उमेदवारीच्या बाबतीत महिलांना उपेक्षित ठेवले. मात्र, पक्ष फुटीनंतर का होईना ही कोंडी फोडत जयश्री शेळके यांना बुलढाण्यातून यंदा उमेदवारी दिली आहे. त्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या पहिल्या उमेदवार ठरल्या आहेत. जिल्ह्यात अस्तित्वाचे आव्हान समोर उभे ठाकलेल्या ठाकरे गटाने शिंदे गटाला शह देण्यासाठी ही मोठी खेळी खेळली आहे. त्यांना विजय मिळाला तर त्या सेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरणार आहेत. तो ३५ वर्षातील पहिला विक्रम ठरणार आहे. सध्या त्यांच्यासमोर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे मोठे आव्हान आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातही शिवसेनेचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी शिंदे गटाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांच्यापुढे तगडे आव्हान निर्माण केले आहे.
बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीसमोरील मोकळ्या मैदानात उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केलेले आहे.