मागील आठवड्यात राज्यातील राजकारणातील सर्वात महत्त्वाची आणि मोठी घडामोड बघायला मिळाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. या बैठकीत अतिशय महत्त्वाची चर्चा झाली. या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का? याबाबत अद्याप समजू शकलेले नाही. पण राजकारणातील दोन मोठे नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या भेटी बाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. उद्धव ठाकरे दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. उद्योजक गौतम अदानी यांचाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला. गौतम अदानी यांच्याबाबत शरद पवार यांनी आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि गौतम अदानी यांचे संबंध चांगले आहेत. गौतम अदानी यांनी बारामतीमध्ये येऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर गुजरातमध्ये शरद पवार गौतम अदानी यांना भेटले होते. परंतु उद्धव ठाकरे यांनी गौतम अदानी यांच्या धारावी प्रकल्पावरुन रान उठवले आहे. ते सातत्याने टीका करत आहेत. त्यावरुन महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नाही, असे दिसून येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, त्याबाबत आम्हाला काहीच माहीत नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी एकाप्रकारे आपली नाराजी बोलून दाखवली. शरद पवार यांनी 22 जुलै आणि 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती.
‘त्यांना’ तिकडूनच मदत करण्याचे सांगता येईल
पक्षातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा संधी मिळणार का? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, पक्षातून बाहेर गेलेले परत येण्याऐवजी त्यांना तिकडूनच मदत करण्याचे सांगता येईल.’ यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी यांनाही घेरले. देशात बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली तरी परतीचे दोर कापावे लागतील, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी लगावला.
आरक्षणाच्या मुद्द्यावर झाली चर्चा ?
आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी मराठा-ओबीसी मतभेदासह इतर मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विरोधी पक्षनेते पवार यांच्यावर टीका करून ते देशातील भ्रष्टाचाराचे सूत्रधार असल्याचा आरोप केल्यानंतर लगेचच ही बैठक झाली.