Political war : सोन्याचा चमचा घेणारे आणि साखरेचे कारखाने असणाऱ्यांनीच मुख्यमंत्री बनायला हवे का? अन्याय उद्धव ठाकरेंवर नाही, आमच्यावर झाला आहे. मुख्यमंत्रीपद शेतकरी पुत्राने सांभाळले तर कशाचे दुःख ? उद्धव ठाकरेंनीच महाराष्ट्रातील जनतेचा सर्वात आधी विश्वासघात केला आहे. स्वतःला मुख्यमंत्री बनविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी खूप आधीच रणनीती बनवून ठेवली होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.
2019मधील निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती केली. निकाल आल्यानंतर मुख्यमंत्रिपदाच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाशी हातमिळवणी केली. महाराष्ट्रातील मतदारांनी युतीला मतदान केले होते. पक्ष का फुटतो? 50 आमदार का जातात? लाखो कार्यकर्ते का जातात? याचे आत्मपरिक्षण उद्धव ठाकरेंनी करायला पाहिजे. मुख्यमंत्री कोण बनणार हा तुमच्या पक्षाचा प्रश्न होता, असे शरद पवारांनी स्वतः मला सांगितले. मुख्यमंत्री बनण्यासाठी सर्वबाबी गुपित ठेवण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच मुख्यमंत्री बनण्याचं खूप वर्षाचं स्वप्न होतं, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
शिंदेंनी केला खुलासा
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांना अटक करण्याची योजना करण्यात आली. भाजपचे आमदार फुटणार, त्यातून महाविकास आघाडी मजबूत होणार, असे त्यांचे राजकारण होते. परंतु त्यांच्यासोबत काम करणारा, जो 25-30 वर्षांपासून तुमचा सहकारी आहे, त्या एकनाथ शिंदेला देखील अडकवा. त्यालाही अटक करा, असा कट महाविकास आघाडीने रचला होता. त्यांचे हे कट माझ्या लक्षात आले. जर माझ्याविरोधात असं कुणी करत असेल, तर मलाही बाळासाहेबांची आणि आनंद दिघेंची शिकवण आहे, तसं मी करेन. मी गडचिरोलीचा पालकमंत्री असताना माझी सुरक्षा मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून हटविण्यात आली. परंतु त्यांचा डाव उलगडला आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा हे वरून आदेश होते असे अधिकाऱ्यांकडून मला समजले, असा खुलासा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
ठाकरेंनी दिली होती धमकी
भाजपने अनेक राज्यात मित्रपक्षांचे कमी आमदार असूनही मुख्यमंत्री बनवले आहे. मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरे यांची संपूर्ण रणनीती तयार होती. उद्धव ठाकरेंनी आमच्यासाठी सर्व दरवाजे खुले आहेत, असे विधान केले. परंतु आम्ही गुवाहाटीला जाणं, ही आमची रणनीती होती. गुवाहाटीला जात असताना, मला उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ते म्हणाले, तुम्ही येऊन दाखवा, लाखो लोक रस्त्यावर येतील. वरळीतूनच तुम्हाला जायचे आहे, अशा प्रकारच्या धमक्या उद्धव ठाकरेंनी आम्हाला दिल्या. परंतु मी कोणाला घाबरत नाही, धमक्या कुणाला देता ? मुंबईत परतल्यानंतर मी रोडनेच प्रवास केला, असे शिंदेंनी सांगितले.
जो गेला तो कचरा, आमची चूक काय? आम्ही पक्षाला 30-40 वर्ष दिली. स्वतःच्या फायद्याचा आणि कुटुंबाचा विचार केला नाही. संपूर्ण जीवन आम्ही पक्षासाठी काम केले. एवढी मोठी तुम्ही गद्दारी केली आम्ही नाही. कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणे, हे नेत्याचे कर्तव्य आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही आजही एकत्रित
देवेंद्र फडणवीस यांना मी मुख्यमंत्री पेक्षा कमी पाहत नाही. भाजपचे महाराष्ट्रात जास्त आमदार आहेत, ही वास्तविकता आहे. आम्ही आजही एकत्रित काम करत आहोत. आम्ही टीम म्हणून काम करत आहोत. आमचे उद्दिष्टे एकच. लोकांना काय द्यायचे, राज्याच्या हिताचं काय करायचे. अडीच वर्षात महाविकास आघाडीने काय केले आणि आम्ही काय करत आहोत, याची तुलना करा. आम्ही त्यांच्यापेक्षा अधिक जास्त काम केले आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.