या लेखातील मते लेखकांची आहेत. ‘द लोकहित’ या मतांशी सहमत असेलच, असे नाही.
Politics राजकारणात काहीही घडू शकते. बदल, फेरबदल होतच असतात. या क्षेत्रात होणारे परिवर्तन सर्व नेते मंडळी अनुभवत असतात. परिपक्व आणि अनुभवी नेत्यांना या क्षेत्रातील चढ उताराची माहिती असते. वास्तवाचे भान राखणारी ही मंडळी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी आपला संयम ढळू देत नाहीत. सर्व गोष्टींचा शांतपणे विचार करतात. विशेष म्हणजे राजकारणातील अशा व्यक्ती सर्वांना सोबत घेऊन चालणा-या असतात. अशा व्यक्ती कोणत्याही पक्षात असल्या तरी त्यांना मान सन्मान मिळतो.
अलीकडे हे चित्र बदलत चालले आहे. राजकारणात एकमेकांविषयी पराकोटीचा वैरभाव दिसून येतो. ‘दोस्तांना’ ऐवजी ‘जानी दुष्मन’ असंच काहीसं विपरीत दिसू लागलं आहे. मागील पाच वर्षांत तर या वैरभावाने वेगळा उच्चांक प्रस्थापित केला आहे. राजकारणात फुकाचा अहंकार, गर्व फार काळ टिकत नाही. नुसत्या वल्गना करणा-या व्यक्तींना केव्हा कुणासमोर झुकावे लागेल, हे सांगता येत नाही.आणि आपल्या आडमुठ्या आणि आक्रस्ताळ्या स्वभावाने उद्धव ठाकरे यांनी ही वेळ स्वतःच ओढवून घेतली आहे.
अधिवेशनाच्या दिवशी भेट
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी परवा परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. देवेंद्र फडणवीस यांनी प्रथेनुसार त्यांचे स्वागत केले. या भेटीनंतर चर्चांना उधाण आले. आतापर्यंत सर्व पातळी आणि नियम यांची बूज न राखता उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अनेकदा बोलताना त्यांनी विखारी बाण सोडले. न शोभणारी टीका आणि वक्तव्य केले. अशी व्यक्ती मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायला कशी काय येऊ शकते, याचे सर्वांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे.
यशाने बेभान..
हेच उद्धव ठाकरे फडणवीस आणि शिंदे यांचा बदला घेण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवित होते. त्यांची सारी कटकारस्थाने आता उघड झाली आहेत. लोकसभा निवडणुकीतील यशानंतर ते इतके बेभान आणि मस्तवाल झाले होते की विचारायची सोय नव्हती. आता आपले सरकार येणार या उन्मादात त्यांनी नुसता कहर माजवला होता. सत्ता काबीज करण्याची ही नशा जनतेनेच उतरवली. त्यांची जागा त्यांना दाखवून दिली. बेभान होऊन सत्ता मिळवण्याच्या नादात त्यांची पार दैना होऊन गेली आहे. भाजपसोबत संबंध दुरावल्यानंतर ते महाविकास आघाडी नावाच्या बुडणा-या बोटेत बसले. मर्यादित काळात सुखाच्या पालखीत झुलले. मविआची बांधलेली मोट म्हणजे महाराष्ट्र आपल्या ताब्यात राहणारी किल्ली, अशा भ्रमात ते वावरु लागले.
नुसत्या वल्गना..
भाजप सोबतच्या युतीत राहून 25 वर्षे सडलो, अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या उद्धव ठाकरे यांचा व त्यांच्या पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. एक तर तू राहशील ,नाहीतर मी.. ढेकणाला हाताने चिरडायचे असते, अशा वल्गना करणा-या उद्धव ठाकरे यांना आज फडणवीस यांच्यासमोर झुकावे लागले आहे. जशी सचिन तेंडुलकर यांची बॅट बोलते तसे देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व बोलते, याची जाणीव त्यांना नक्कीच झाली आहे.
सतत चुकीची वागणारी आणि बोलणारी स्वार्थी माणसं सारं काही क्षणात विसरतात. आपल्या वागण्या बोलण्याचा त्यांना कधीच पश्चात्ताप होत नाही. गरज पडली की ते कुणासमोर झुकायलाही मागेपुढे पाहत नाहीत. अशाच स्वार्थी हेतूने त्यांनी ही भेट घेतली असावी. आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. गाफील राहीलो अन् जुन्या प्रकरणांना वेगळीच ‘दीशा’ मिळाली तर उगाच मागे चौकशीचा ससेमिरा लागायला नको. हा बहुधा या भेटीचा मुख्य हेतू असावा.
नितेश राणेंचा काय भरवसा ?
आता या सदिच्छा भेटीचा वेगवेगळा अर्थ काढला जातो आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी तर हा उध्दव ठाकरे यांचा स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. उगाच नसती प्रकरणे उकरुन काढून चौकशीच्या फेऱ्यात अडकवू नका, या साठी ही भेट होती, असेही त्यांनी सांगितले आहे.
आता सारे हिरावले गेले आहे. किमान विरोधी पक्ष नेत्याचे तरी बघा, अशी आर्जव उध्दव ठाकरे यांनी केल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतल्यास स्वतः हून आपल्या समोर काही तरी मागायला आलेल्या एकेकाळच्या मित्राला काहीतरी दिल्यासारखे होईल. मी बदल्याचे नाही तर बदल घडवून आणणारे राजकारणात करीन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच सा़गीतले आहे. त्यांनी मोठेपणाने सर्वांना माफ केले आहे.
वाताहत..
उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती. नेहमीच्या प्रथा पाळण्याचा तो भाग होता. यात फारसे नवल वाटण्यासारखे काहीच नाही. फडणवीस युद्ध जिंकले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या हातून बरचं काही अलगद निसटलं आहे. राजकारण ‘खेळवणा-यांच्या’ नादी लागून त्यांनी आपल्या पक्षाच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लावला आहे. अती उत्साहाच्या भरात सारं काही विस्कटून गेलं आहे. या वाताहातीला ते स्वतः आणि त्यांचा उतावळा स्वभाव कारणीभूत आहे.