Lok Sabha Election : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अनेक मोठे भ्रष्टाचार व सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी झाली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर उद्धव ठाकरे यांनी नवनीत राणा यांच्यासारख्या महिलेला तब्बल 14 दिवस तुरुंगात ठेवले. घरासमोर स्टेज टाकून हनुमान चालिसा वाचू दिली असती तर काय बिघडलं असतं, असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे हा प्रचंड लाचार माणूस असल्याची कडवी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता. 2) अमरावतीमध्ये केली.
अमरावती जिल्ह्याचे राजकारण सध्या तापत आहे. अशातच आज भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील एका हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, देशात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात 400 पार खासदार निवडून आणण्यासाठी कटिबद्ध आहे. आज देशात अनेक महत्त्वाचे बदल होत आहेत.
विशेष म्हणजे कधीकाळी भारतावर डोळे वटारणारे देशसुद्धा आज भारतासमोर नतमस्तक झाले आहेत. भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांचे स्वप्न हे 2047 चा विकसित भारत आहे. त्यासाठी प्रत्येक वॉरियर्सने जीव ओतून काम केले पाहिजे. प्रत्येक बूथवर फक्त 51% मत आपल्याला हवे आहेत आणि तोच विजयाचा समृद्ध मार्ग आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
Lok Sabha Election : यवतमाळमध्ये देशमुख ; बुलढाण्यात खेडेकरांना ठाकरे गटाकडून संधी
लोकसभेच्या निकालावर पुढील निवडणुकांमध्ये उमेदवारी..
भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांसह तब्बल 11 पक्ष मिळून आपण काम करत आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याला कमळाचे फुल हाच आपला उमेदवार समजून काम करायचे आहे. रुसवे फुगवे नाराजी दूर ठेवून काम करा आणि आपल्या दिलेल्या बूथवर किमान 51% मत मिळवा. कारण लोकसभेच्या विजयावरच विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकांचे भविष्य असणार आहे.
4 जूनला भाजप कार्यालयातून येईल पत्र
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी भारत मातेला स्मरून प्रयत्नाची पराकाष्ठा करत पूर्ण करा. पेज प्रमुख बूथ प्रमुख व वॉरियर्स यांना त्यांच्या मतदान केंद्रावर किती टक्के मतं मिळाले, याचे पत्र मी तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी रात्री सात वाजेपर्यंत पाठवेल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.