Maharashtra Politics : महिलांच्या बचत गटांकडून पोषण आहार बनवला जातो, तो त्यांच्याकडे राहू द्यावा, यासाठी विदर्भातील महिला आल्या होत्या. मंत्री आदिती तटकरे यांच्याशी बोलून त्यांचे समाधान झाले. महिला बचत गटांकडून कडून काम काढून घेणार नाही, असे आश्वासन तटकरेंनी दिल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
ठाकरेंवर वार
आज (ता. 20) नागपुरात बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली. ते म्हणाले, उद्धव ठाकरे यांचे उमेदवार जे निवडून आले आहेत, ते तपासले तर हिंदुत्व सोडलं म्हणून मुस्लिम समाजाचे मतं त्यांना मिळाल्याचं दिसतंय. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. कोकण असो, मुंबई असो, आता कुठलाच माणूस हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत नाही. आम्ही अपयशी ठरलो. त्याचे परीक्षण आता करत आहोत. पण उद्धव ठाकरे ते करत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाढवण्याचे काम उद्धव ठाकरे करत आहेत.
आरक्षणाच्या मुद्द्यावर
आरक्षणाच्या संदर्भात विचारले असता, आरक्षणसाठी सुप्रीम कोर्टाचे निकाल आहेत. संविधानिक जे आहे ते 50 टक्के आहे. 50 टक्क्याच्या वर जर आरक्षण गेलं तर सुप्रीम कोर्टात टिकत नाही. जो काही निर्णय दिला गेला आहे, तो कुठल्या मेरिटवर दिला गेला, ते बघावं लागेल. त्यानंतरच यावर काही बोलता येईल. पण विरोधकांना आरक्षणावर राजकारण करणे बंद केले पाहिजे.
Bhandara News : बचत गटांच्या अवैध सावकारीला कुणाचे ‘आधार लिंक’?
खटाखट खोटे बोलले
महाविकास आघाडीकडे मुख्यमंत्रिपदाचे पाच दावेदार आहेत. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघे मुख्यमंत्री बनण्यासाठी तयार झाले आहे. यांनी खटाखट खटाखट 8,500 हजार रुपये महिना खोटे बोलून मतदान घेतलं आहे. मोदींनी संविधानाला हातात घेऊन पंतप्रधानपदाचा कार्यकाळ तिसऱ्यांदा सुरू केला. या खोटारडेपणावरच महाविकास आघाडीला मतं मिळाले आहेत. महाविकास आघाडीने जनतेला माफी मागितली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.
रामटेकसह महाराष्ट्रात 31 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले. त्यांनी या ठिकाणी खटाखट 8,500 हजार रुपये योजना सुरू करावी. नाही तर नाना पटोले आणि उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आता लोक रांगा लावतील. पण हा खोटेपणा जास्त दिवस चालणार नाही. नरेंद्र मोदींसोबत कुणाची तुलना होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंच्या भाषणाला लोक कंटाळलेले आहेत. अडीच वर्षात त्यांनी काय काम केलं, कोणता विकास केला, असे टोमणे मारून महाराष्ट्र पुढे जाणार नाही, असेही ते म्हणाले.
सकाळचे राजकीय भोंगे न वाजवता शेतकरी शेतमजुरांच्या विकासाकरिता काय तुमचं म्हणणं आहे, हे सांगितलं पाहिजे. खोट्या मुद्द्यांवर लोकसभा लढली आता विधानसभा कुठल्या मुद्द्यावर लढणार आहे? रामदास कदम अजित पवारांबद्दल काय बोलले. त्यांचं तात्पर्य काय होतं मला माहिती नाही. केंद्र सरकारचे आभार मानतो की, त्यांनी शेतकऱ्यांच्या 14 पिकांवर एमएसपीमध्ये वाढ केली. राज्य सरकारने सुद्धा या 14 पिकांवर एमएसपी वाढवून दिली पाहिजे. कापसाला, सोयाबीनला आणि इतर पिकांना चांगला भाव मिळेल.
पवारांची भूमिका आरक्षणा विरोधात
केंद्र सरकारचा मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणात थेट कुठलाही संबंध नाही. शरद पवार एवढे दिवस सत्तेत होते. पण त्यांची भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे. शरद पवार यांच्या सरकारमधील जीआर बघितले, तर त्यांना त्यावेळेस जी सवलत देता आली असती, तीसुद्धा त्यांनी दिली नाही. पण मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शरद पवार यांनी कुठलीही भूमिका घेतली नाही. आता मात्र ते बोलत आहेत. हे आश्चर्य आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाहीत. कोर्टात लढले नाही, त्यांच्या काळात आरक्षण गेलं. आता कुठल्या अधिकाराने बोंबा मारत आहेत. भाजप आणि महायुतीने ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण दिले असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सकाळचे टोमणे मारले जातात. पण विकासाच्या मुद्द्यावर ते बोलत नाही. सकाळचे टोमणे बंद करून महाराष्ट्राला आणि सरकारला मदत केली पाहिजे. सुजय विखे यांच्यासंदर्भात बोलताना सुजय विखे हे यांनी ईव्हीएम संदर्भात तपासणी करण्याचा उमेदवार म्हणून त्यांचा अधिकार आहे. जर कुणाला शंका वाटत असेल तर शंका निरसन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.