Maharashtra Assembly Elections : पूर्व विदर्भात विधानसभेच्या 28 जागा आहेत. पाच लोकसभेच्या जागा आहेत. 28 जागांपैकी जास्तीत जास्त जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आम्ही आग्रही आहोत. 2019मध्ये शिवसेना-भाजप एकत्र लढले आणि आमच्या 28 पैकी 14 जागा निवडून आल्या. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार त्या 14 जागा आमच्या हक्काच्या आहेत, असे उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव म्हणाले.
एकत्र लढणार
गुरूवारी (ता. 26) नागपुरात आले असताना विमानतळावर जाधव पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, दावा प्रत्येक पक्षाने केला पाहिजे. काँग्रेस आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढणार आहोत. जागांवर चर्चा होऊ शकते, अदलाबदल होऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या जागांवर आम्ही दावा करत नाही. पण आमच्या त्यावेळच्या युतीच्या ज्या जागा होत्या, त्या आम्हाला मिळाल्या पाहिजे. हा आमचा हा दावा कुणावर कुरघोडी करण्यासाठी नाही, तर आमचा हक्क आहे.
वैभव नाईक जे म्हणाले, त्यामध्ये सत्यता आहे. त्या ठिकाणी सगळ्यात निकृष्ट दर्जाचे काम झालं. निकृष्ट दर्जाच्या कामाची स्पर्धा लावली तर या कामांमध्ये जे कोणी ठेकेदार आहेत, ते ती स्पर्धा जिंकतील. इतकं निकृष्ट दर्जाचं काम झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होणार आहे, त्या दिवशी मी यावर विस्ताराने बोलणार आहे, असेही भास्कर जाधव म्हणाले.
त्याठिकाणी कुठली लेवल नाही, इंटरलॉकिंग नाही. काळी वाळू वापरलेली नाही. समुद्रातील पांढरी वाळू वापरली. त्या ठिकाणी पीसीसी केलेलं नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा हा पोकळ आहे. तो पुतळा वाऱ्याने पडला, असं म्हणतात. वारा पश्चिमेकडून येतो, मात्र पुतळाही पश्चिमेकडे पडला आहे. या लोकांनी छत्रपतींच्या पुतळ्यातसुद्धा भ्रष्टाचार केला आहे. वैभव नाईक यांना कसली नोटीस देता? ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना नोटीस द्या, असे जाधव यांनी सरकारला सुनावले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहिला पाहिजे. मात्र ज्यांनी हा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला, त्या भ्रष्टाचारी लोकांच्या हातून हा पुतळा उभा राहता कामा नये. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीचं सरकार आणावं आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडी पुतळा उभारेल.
जाधव यांच्या मुलाने अजित पवारांचा सत्कार केला. यावर विचारले असता, कुठल्याही पक्षाचे नेते माझ्या जिल्ह्यात येतात, तेव्हा शाल, श्रीफळ भेट देणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हेच संस्कार मुलांवर केले. त्यामुळे त्यांनी अजित पवारांचा सत्कार केला. तो सत्कार लपून केला नसून जाहीरपणे केला, असही भास्कर जाधव म्हणाले.
Congress : ‘चलना है-लढना है..’, म्हणत संगीता तलमले पूर्व नागपूरच्या मैदानात !
कुठलाही भ्रष्टाचार नाही
संजय राऊत यांनी कुठलाही भ्रष्टाचार केला नाही. त्यांना शंभर दिवस जेलमध्ये टाकले. संजय राऊत हे सरेंडर न झाल्यामुळे त्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम झालं. विरोधकांनी काही बोलायचंच नाही, अशा पद्धतीचे काम सुरू आहे. लोकशाही संविधान वाचवण्यासाठी लोकसभेची जनजागृती झाली. सत्तांध झालेल्यांना जनतेने लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवली. विधानसभा निवडणुकीतही तेच होणार, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.