Political War : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने राज्यात 48 पैकी 30 जागा जिंकल्या तर महायुतीला केवळ 17 जागांवर समाधान मानावे लागले. तर मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांपैकी चार जागाही महाविकास आघाडीने जिंकल्या होत्या. यामध्ये ठाकरे गटाच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे. मुंबईत ठाकरे गटाला मिळालेले हे यश शिवसेना ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
विजय प्राप्त झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे मतदारांचे आभार मानले होते. मात्र, हे आभार मानताना ठाकरे यांनी दलित, बौद्ध समाजाचा उल्लेख न केल्याने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर हे प्रचंड संतापले होते.
दरम्यान त्यानंतर आता उद्धव ठाकरे हे दलित आणि बौद्ध समाजाचे आभार मानतानाचा व्हिडिओ आंबेडकर यांनी पोस्ट करीत ‘कोणीतरी तुम्हाला दलित आणि बौद्धांचा पाठिंबा मान्य करण्यास भाग पाडले का ?असा सवाल विचारत खोचक टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले. मात्र उध्दव ठाकरे यांनी दलित बौद्ध समाजाचे आभार न मानल्याने प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला होता. ट्विट मध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘गरज सरो वैद्य मरो’चे उत्तम उदाहरण. उच्चवर्णीय हिंदू नी भाजपाला मतदान केले आणि उबाठा शिवसेना किंवा महाविकास आघाडीला नाही. ह्या निवडणुकीत दलित, मुस्लिम, बौद्ध, ख्रिचन, बहुजन यांनी ऊबाठा शिवसेनेला आणि मविआला मतदान केले. असे आंबेडकर म्हणाले.
आंबेडकर पुढे म्हणाले की, त्यांचा पक्ष वाचविण्यात दलीत, बौद्ध यांच्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा करावासा वाटला नाही. ही खरी त्यांची मानसिकता! दलित आणि बौद्धांनो आता शहाणे व्हा. तुम्ही त्यांचे पक्ष वाचवलेत पण तुम्ही त्यांच्या खिजगणतीतही नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. यावर ठाकरे गटाकडून कोणती प्रतिक्रिया येणार याकडे लक्ष लागून होते. आता उद्धव ठाकरे यांचा सर्वांचे आभार मानतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ प्रकाश आंबेडकर यांनी रिट्विट करीत तुम्हाला दलित आणि बौद्धांचा पाठिंबा मान्य करण्यास भाग पाडले का? असा प्रश्न विचारला आहे.
ठाकरे नेमकं काय म्हणाले होते
उद्धव ठाकरे यांनी आभार मानताना लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मीयांनी मतदान केले. ज्यामध्ये मराठी होते, हिंदू होते, मुस्लीम होते आणि ख्रिश्चनदेखील होते, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यात दलित आणि बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्याने सोशल मीडियावर अनेकजण नाराजीच्या प्रतिक्रिया व्यक्त करत होते.
Mahayuti Politics : ‘या’ नेत्याने सांगितले, मराठवाड्यात महायुतीच्या पराभवाचे कारण
ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या तीन लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अनुक्रमे संजय दिना पाटील, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. या मतदारसंघांमधील बौद्ध आणि दलितबहुल भागात ठाकरे गटाला भरभरुन मतदान झाले आहेत.
आंबेडकर नेमकं काय म्हणाले
उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओ नंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा ट्विट केलं आहे. आंबेडकर म्हणाले, मला आश्चर्य वाटते की, मी माझी तीव्र चिंता व्यक्त केली नसती, तर दलित आणि बौद्धांचा पाठिंबा ओळखला गेला असता. कोणीतरी तुम्हाला दलित आणि बौद्धांचा पाठिंबा मान्य करण्यास भाग पाडले का? मला आशा आहे की दलित आणि बौद्धांच्या लक्षात आले असेल की हे पक्ष निवडणूक फायद्यासाठी तुमचा कसा वापर करतात आणि नंतर तुम्हाला टाकून देतात. मी आणि माझा पक्ष या वस्तुस्थितीचा सर्वात मोठा साक्षीदार आहोत.