महाराष्ट्र

Uddhav Thackeray : दिल्लीत बसलेल्या दोघांच्या बुडाला आग लावू!

Shiv Sena : उद्धव ठाकरे पुन्हा आक्रमक; ‘मार्मिक’च्या कार्यक्रमातही राजकीय भाषण

विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे व्यासपीठ कुठलेही असले तरीही राजकीय भाषणे होत आहेत. त्यातही मोठे नेते असतील तर ते अधिक आक्रमक झालेले दिसतात. उद्धव ठाकरे यांनी याची प्रचिती दिली. ‘मार्मिक’च्या वर्धापनदिनाला ते उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ‘दिल्लीतील दोघांच्या बुडाला मशालीची आग लावू’, असे आक्रमक विधान केले.

‘मार्मिक’ हे व्यंगचित्रांचे साप्ताहिक स्व. बाळासाहेब ठाकरे यांनीच सुरू केले. ठाकरे कुटुंबीय आजही संपादक मंडळावर आहेत. दर्जेदार व्यंगचित्रांमधून राजकीय भाष्य करण्याचे काम मार्मिकने केले. याच साप्ताहिकाचा ६४वा वर्धापनदिन होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तोफ डागली.

दोन महाराष्ट्र द्वेष्टे आपल्याच खांद्यावर पाय ठेवून दिल्लीत बसले आहेत. तेच आपल्याला लाथा घालण्याची भाषा करीत आहेत. त्यांच्या बुडाला मशालीची आग लावायची आहे, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. मार्मिकचा प्रवास कुंचल्यातून सुरू झाला. आजही कुंचला सोडलेला नाही. पण आता कुंचल्याची मशाल झाली आहे. जे लोक आपला वापर करून दिल्लीत बसले आहेत त्यांच्या बुडाला या मशालीची आग लावायची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव म्हणाले, ‘मी व्यंगचित्र काढत नाही. पण मला बोलता येतं. माझ्याकडे शब्द आहेत. माझे शब्दच मशाल आहेत. आपल्या खांद्यावर चढून ते दोघे महाराष्ट्रद्वेष्टे दिल्लीत बसले आहेत. आणि आज आपल्यालाच लाथा घालण्याची भाषा करत आहेत. त्यांचच तंगडं पकडून बाजुला फेकण्याची तयारी मी केली आहे. मी कुठल्याही शत्रूला घाबरत नाही.’

Nagpur : विद्यापीठाच्या राजकारणात भाजपचेच नेते आमने-सामने!

उद्या ते ‘मार्मिक’वर दावा करतील!

यावेळी उद्धव गटाचे नेते भास्कर जाधव देखील उपस्थित होते. त्यांनी मार्मिकच्या व्यवस्थापनाला वर्गणी वाढविण्याचा सल्ला दिला. त्याला उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘भास्कर जाधव यांनी वर्गणी वाढविण्याचा सल्ला दिला आहे. पण उद्या कुणीतरी उभा होईल आणि म्हणेल माझे वर्गणीदार जास्त आहेत. त्यामुळे ‘मार्मिक’ माझा झाला. मग कुणीतरी हॉटेलमध्ये जाईल. सगळ्या रुम्स बुक करेल आणि हॉटेलवर दावा करेल. उगाच कशाला नसते उपद्व्याप करायचे?’

राजकीय सभेचे वातावरण

‘मार्मिक’च्या वर्धापन दिनात उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे राजकीय सभेचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उद्धव यांनी अत्यंत आक्रमकतेने भाषण केले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि मार्मिकच्या संदर्भातील जुन्या आठवणींचाही उल्लेख केला. मात्र मोदी आणि शाहंवरील विधानांचीच चर्चा जास्त झाली.

error: Content is protected !!