Assembly Election : लोकसभा निवडणुकीत जनतेने भाजपला नाकारले आहे. त्यामुळं आता ते हिंदुत्वाच्या नावावर मतं मागत आहे. ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी भीती ते दाखवित आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ सध्या लोकांना हिच भीती घालत आहेत. परंतु भाजपमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरी सुरू झाली आहे. त्यामुळे भाजपची अवस्था आता ‘बटेंगे और कटेंगे बाद में फटेंगे’ अशी झाल्याची टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघात आयोजित सभेत ते बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यातही यांनी भ्रष्टाचार केला. त्यामुळं हे सरकार उखडून फेकलं तर प्रत्येक मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारणार असल्याचं ठाकरे यांनी जाहीर केलं. भाजपचं सध्या ‘महाराष्ट्र को लुटेंगे और गुजरात के दोस्तो में बाटेंगे’ असं चाललं आहे. त्यामुळं यंदा मतदारांनी न्याय करावा असं ठाकरे म्हणाले. न्यायालयात निवडणूक चिन्ह आणि पक्षाच्या मुद्द्यावर निकाल होणार होता. मात्र निकाल लागला नाही. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी आता काढण्यात आली आहे. त्यामुळं आता उघड्या डोळ्यांनी न्याय मिळेल असं वाटत होतं. परंतु तसं झालं नाही.
Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र सामान्यांमध्ये बसतात तेव्हा
जनताच न्याय करेल
आपला न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. परंतु आता आपण आपला मुद्दा जनतेच्या कोर्टात मांडला आहे. आता जनताच आपला न्याय करेल. जनता ज्यावेळी न्याय करेल त्यावेळी दुष्टांना योग्य ती शिक्षा मिळेल. निवडणुकीनंतर एक व्यक्ती बेरोजगार होणार आहे, असं ते म्हणाले. देवेंद्र फडणवीसांवरही त्यांनी टीका केली. अमरावतीमधील राणा दाम्पत्यावरही ठाकरे यांनी नाव न घेता हल्ला केला. ठाकरे म्हणाले, काही लोक असंस्कृत असतात. या लोकांना काहीही केलं, कितीही केलं तर सुसंस्कृत होता येत नाही. त्यामुळं त्यांच्याकडं दुलक्ष करा.
मुलींविषयी प्रश्न
सद्य:स्थिती मुलगी शिकली की प्रगती झाली असं सांगण्यात येतं. पण मुलांच्या बाबतीत काय असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला. त्यामुळं आपलं सरकार आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण देण्यात येणार असल्याचं ठाकरे यांनी जाहीर केलं. जनाधार कमी होत चालल्याचे पाहून निवडणुकीच्या तोंडावर यांचे बहिणींसाठी प्रेम उफाळून आले आहे. राज्यात देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जॅकेटभाऊ हे तीन भाऊ आहेत. त्यांच्यात भाऊबंदकी आहे. पण, तरीही ते एकत्र फिरताहेत. आपण तिघे भाऊ, मिळून महाराष्ट्र खाऊ, असेच त्यांचे वर्तन आहे, अशी टीका त्यांनी केली.