Chatrapati Shivaji Maharaj : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. मोहन भागवत यांना प्रश्न विचारला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथुन ठाकरे यांनी भागवत यांचे नाव घेत हिंदुत्व आणि भाजपवरून काही मुद्दे उपस्थित केले. संघाला शिवसेना नको आहे का, हे भागवतांनी सांगावे. परंतु भाजपचे जे द्वेषाचे, सुडाचे राजकारण सुरू आहे, ते संघाला हवं आहे का, हे भागवतांनी सांगावे, असे ते म्हणाले.
काँग्रेसने शिवसेनेकडे रामटेकची जागा मागितली. लोकसभा निवडणुकीत ही जागा शिवसेनेने त्यांना दिली. शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने मनापासून काम करीत श्याम बर्वे यांना विजयी केले. त्यामुळे शिवसेना भाजपसारखे पाठीमागून वार करीत नाही. रश्मी वर्बे यांच्या जातीचे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. आता न्यायालयाने त्यावर निकाल दिला आहे. त्यामुळे ज्यांच्या इशाऱ्यावरून हे प्रमाणपत्र रद्द झाले त्यांचे नाव पुढे आले पाहिजे. त्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले.
बावनकुळेंवर टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावरही ठाकरे यांनी निशाणा साधला. मोक्याच्या जमिनी घशात घालण्याचा धंदा भाजपने चालविला आहे. हिंमत असेल तर भाजपने बावनकुळे यांना ज्या दरात जमीन दिली, त्याच दरात आमच्या एखाद्या व्यक्तीला जमीन द्यावी. आता तर सरकार अदानीची आरती करणार आहे. विदर्भाच्या चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील शाळा अदानीला दिली आहे. त्यामुळे अदानीचे घर भरले जाणार आहे. आपण पैसे देऊन गर्दी जमवलेली नाही. सभेला आलेली गर्दी सच्च्या मराठी माणसाची आहे, असेही ठाकरे म्हणाले.
राज्यात परिवर्तनाची नांदी लागली आहे. त्यामुळे त्याची सुरुवात रामटेकमधून करा. या भागातील जनतेने महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ द्यावी, असे आवाहन देखील ठाकरे यांनी केले. आपण दिल्लीवाल्यांपुढे भीकेचे कटोरे घेऊन उभे राहणार नाही. आपल्याला नरेंद्र मोदी किंवा अमित शाह संपवू शकत नाही. उद्धव ठाकरेला संपवायचे असेल तर ती ताकद फक्त जनतेतच आहे. मुंबई विद्यापीठातील सिनेट निवडणूक पुढे ढकलली जात होती. मात्र डिपॉझिट जप्त होईल इतकी मतं विरोधकांना पडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) वैगरे सगळ्याची मतं एकत्र केली तरी विजयी उमेदवाराच्या मतांची बेरीज होत नाही, असेही ठाकरे म्हणाले.