Industrialisation : नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून गडचिरोलीची ओळख आहे. पण येत्या काळात जुनी ओळख पुसून उद्योग नगरी म्हणून गडचिरोली उदयास येईल, असा विश्वास महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. वडलापेठ येथे सूरजागड इस्पात या लोह पोलाद कारखान्याच्या भूमिपजनासाठी ते दाखल झाले आहेत.
या प्रकल्पाच्या माध्यमातून गडचिरोलीची नक्षलवादी जिल्हा अशी ओळख पुसून उद्योग नगरी करण्याचा हा प्रयत्न आहे. हा दहा कोटींचा प्रकल्प आहे. यातून स्थानिकांचा रोजगाराचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गडचिरोली साठी धर्मराव बाबा आत्राम यांचे योगदान मोठे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारक असा हा प्रकल्प आहे. गडचिरोलीसह महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठी देखील हा प्रकल्प तेवढाच महत्त्वाचा आहे. दावोस करारावर वारंवार टीका होत होती. त्यालाही या प्रकल्पाच्या माध्यमातून एक प्रकारे उत्तर मिळाले आहे, असेही उदय सामंत म्हणाले.
स्थानिकांना रोजगार अनिवार्य
कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार देण्याचे शासनाने अनिवार्य केले आहे. तसा शासन निर्णयच आहे. गडचिरोली मध्ये 75 टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांना काम मिळेल. या प्रकल्पात 10000 कोटी रुपये खर्च होत आहे. त्यात 75 टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांना प्राधान्य असावे. बाकीच्या राज्यांपूर्वीच महाराष्ट्राने नियम केला आहे, असेही उदय सामंत यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंकडे एवढे उमेदवार आहेत?
उबाठा हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कोणाबरोबर आघाडी करावी, कुणासोबत युती करावी, हा त्यांचा प्रश्न आहे. स्वबळावर लढण्याचा उद्धव ठाकरे यांचा विचार असावा. म्हणूनच २८८ मतदारसंघांमध्ये चाचपणी करत असतील. पण एवढे उमेदवार आपल्याकडे आहेत का, हे त्यांना चाचपणी केल्यावरच कळेल.
महाराष्ट्राला भडकावू नका
विशाळगडाच्या बाबतीत जातीपातीचे राजकारण करण्यात अर्थ नाही. अनधिकृत बांधकामामुळे उद्रेक झाला होता. निवडणुका आहेत म्हणून जातीपातीचे धर्माचे राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचे काम कोणी करू नये, अशी प्रतिक्रिया त्यांनी ओवेसींच्या भूमिकेवर दिली.
एका चांगल्या नेत्याला संपवले?
महायुतीला कुणी मतदान केले, याचे पडसाद विधानसभेत दिसतील. शेकापचे जयंत पाटील यांची मते फुटणार असे दिसत होते. पण, तरीही एका चांगल्या नेत्याला संपविण्याचे काम महाविकास आघाडीने एकत्रितरित्या केले, अशी टीका उदय सामंत यांनी केली.
भुजबळ महायुतीतच
छगन भुजबळ हे महायुतीतच आहे. त्यांच्याबाबतीत निरर्थक चर्चा होत आहेत, असे ते म्हणाले. मराठा समाजाला दहा टक्के टिकणारे आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असेही आश्वासन दिले. पण तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद पेटविला जात आहे, अशी टीका त्यांनी केली.
विदर्भाची यादी तयार!
विधानसभा निवडणुकीत विदर्भातून किती जागा लढवायच्या याची यादी तयार आहे. याचे संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीमधील सर्व पक्षांनी आपापली तयारी सुरू केली आहे, हेच यावरून स्पष्ट होते.