महाराष्ट्र

Porshe Hit and Run : दोघांना चिरडल्यानंतर सहजासहजी जामिन कसा मिळाला ?

Pune Accident : बालहक्क न्यायालयात सुनावणी सध्या सुरू झाली आहे

वेदांत अगरवाल या बड्या बिल्डर बापाच्या लाडाच्या पोरानं दारूच्या नशेत पोर्शे ही महागडी गाडी सुसाट चालवत अभियंता युवक-युवतीला चिरडून टाकले. त्यानंतर काही तासांतच वेदांतला जामीन मिळाला. बेदरकारपणे गाडी चालवत दोघांचा जीव घेणाऱ्याला (भलेही तो अल्पवयीन का असेना) तात्काळ जामीन कसा काय मिळाला, असा संतप्त सवाल राज्यातील जनता विचारत आहे. 

हाच अपघात जर एखाद्या सामान्य माणसाच्या हातून झाला असता, तर पोलिस आणि व्यवस्थेने इतकी तत्परता दाखवली असती का, असाही सवाल उपस्थित झाला आहे. आता तर आरोपी वेदांतला प्रौढ गृहीत धरून खुनाचा खटला चालवावा, अशीही मागणी पुढे आली आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणातील एक आरोप अल्पवयीन होता. पण त्याचे वय १५ पेक्षा अधिक असल्याने त्याला प्रौढ समजण्याबाबत मोठी चर्चा घडून आली होती. आता वेदांतलाही तोच न्याय लावण्याची मागणी होत आहे. प्रौढ समजून कारवाई झाल्यास वेदांतला अटक होण्याची शक्यता आहे.

ज्या पबमध्ये वेदांतने पार्टी केली होती. त्याचे बिल त्याने स्वतः दिल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. कार्ड पेमेंट केल्याचीही माहिती आहे. दरम्यान त्या पबचा परवाना रद्द करण्याचे आदेश शंभुराज देसाई यांनी दिले आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी माध्यमांना सांगितले की, अद्याप वेदांतचा ब्लड रिपोर्ट आलेला नाही. रक्ताचे नमुने १२ तासांच्या नंतर घेतल्यास रिपोर्ट योग्य मिळत नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रक्ताचे नमुने देऊन दोन दिवस झाले तरी रिपोर्ट कसा मिळाला नाही, असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे.

काँग्रेस नेते आक्रमक 

या प्रकरणात काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. मोठ्या घरचा बिघडलेला मुलगा दारूच्या नशेत गाडी चालवून दोघांची हत्या करतो. त्याच्यावर पोलिस दया दाखवत आहेत. हीच दया इतर चालक जसे ट्रक, बस, टॅक्सी, ऑटो चालकांच्या बाबतीत दाखवली गेली असती का, असा सवाल करत धंगेकरांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी या प्रकरणात कोट्यवधी रुपये खाल्ले असल्याचा थेट आरोप त्यांनी केला. आरोपी वेदांत वर ३०२ आणि ३०४ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी धंगेकरांनी केली आहे.

National Cancer Institute : रेशन दुकानदारांनाही मिळावे ‘एनसीआय’मध्ये मोफत उपचार !

दरम्यान वेदांत अगरवाल आणि त्याच्या वडीलांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. दोघांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याच्या वडीलांना काल रात्रभर पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. बालहक्क न्यायालयात सुनावणी सध्या सुरू झाली आहे. या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देणार, याकडे पुणेकरांसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. या प्रकारामुळे सद्यस्थितीत राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसत आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!