Buldhana Constituency : एकीकडे आयपीएल आणि आता लोकसभा निवडणुकीमुळे सट्टा बाजार तेजीत आहे. मतदान पार झाल्यानंतर कोण निवडून येईल ? या अंदाजावर सट्टा बाजारातील बुकींनी लक्ष केंद्रित केले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव आणि महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ होईल,असे बुकींना कदापिही वाटत नाही. म्हणूनच सट्टा बाजारात आज शनिवारी जाधव यांचे भाव 55 तर प्रा. नरेंद्र खेडेकरांचा 95 पैसे भाव असल्याचे सट्टा बाजारातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
कोण मारणार बाजी
बुलढाणा लोकसभा क्षेत्रासाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले. मतदानानंतर कोणता उमेदवार बाजी मारणार, कोण किती मतांच्या फरकाने विजयी होणार, कोणत्या विधानसभा क्षेत्रात कोणता उमेदवार मताधिक्य मिळविणार, एक्झीट पोल काय आहे, यावर आता जोरदार चर्चा रंगू लागली आहे. त्यातच सट्टा बाजार आणि बुकीही सक्रिय झाले आहेत. आपली पोळी भाजून घेण्यासाठी सट्टेबाजांकडून निकालाबाबत अंदाज लावण्यात येत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात कोणत्या उमेदवाराला किती प्रतिसाद मिळाला, त्यानुसार संबंधित उमेदवाराचा सट्टाबाजारातील ‘भाव’ ठरत आहे.
उमेदवारांच्या विजयाची शक्यता
सट्टा बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता असते, त्याच्यावर सर्वात कमी पैसे लावले जातात. अर्थात जो उमेदवार विजयी होणार त्याला कमी भाव तर पराभूत होणाऱ्या उमेदवाराला जादा भाव सट्टेबाजांकडून दिला जातो. यानुसार मतदानानंतर सट्टा बाजारात महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांचा भाव 25 पैसे तर महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचा दर 2 रुपये होता. मात्र,कालांतराने यात मोठा बदल झाला. आज शनिवारी जाधव यांचा भाव 55 आणि खेडेकरांचा भाव 95 इतका असल्याचे सूत्रांनी सांगितले. याचाच अर्थ दोघांमध्ये अटीतटीची लढत दिसून येत नाही.
दरम्यान, ग्रामीण भागातील मतदारांचा कौल अद्यापही पूर्णपणे मिळालेला नसल्याने यात पुन्हा मोठ्या फरकाने बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. जसजसा निकालाचा दिवस जवळ येईल तसतशी भावात तफावत दिसेल असे सांगण्यात येत आहे.
निव्वळ अनिश्चितता
खरे तर सट्टा बाजार म्हणजे निव्वळ अनिश्चितता. सध्या आयपीएलचा माहोल असला तरी सट्टा बाजारातील बुकींनी लोकसभा निवडणुकीला प्राथमिकता दिली आहे. खासदार प्रतापराव जाधव हे हॉट फेव्हरेट ठरू शकतात असे सट्टा बाजारातील सूत्रांचे म्हणणे आहे. इतर उमेदवारांबद्दल मात्र बुकी फारसे उत्साही नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोणता उमेदवार बाजी मारणार आणि कोणता पक्ष सत्तेवर येणार याबाबतचा अटीतटीचा जुगार रंगू लागला आहे.
सट्टा बाजारातील भाव
प्रतापराव जाधव (महायुती) – 55 पैसे, प्रा. नरेंद्र खेडेकर (महाविकास आघाडी) – 95 पैसे, रविकांत तुपकर (अपक्ष) – 5 रुपये, वसंतराव मगर (वंचित) – 10 रुपये. सध्या तरी बाजाराचा कौल प्रतापराव जाधव यांच्या बाजूने दिसतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत अंदाजात फरक पडेल का ही उत्सुकता राहणार आहे.