महाराष्ट्र

Shiv Sena : बाळापूरच्या गडावर कोण होणार किल्लेदार?

Assembly Elections : महायुतीत मतदारसंघासाठी होणार रस्सीखेच

Balapur constituency : आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी पक्षांमधील जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघासाठी महायुतीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष बाळापूर मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. महायुतीतील तीनही पक्षापैकी नेमका कुणाला हा मतदारसंघ मिळतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशीच स्थिती सर्वच पक्षांतील इच्छूकांसंदर्भात आहे. त्यामूळे या मतदारसंघातील संभाव्य उमेदवारांचे चित्र अद्यापही काहीसे धुसर आहे. 

बाळापूर मतदारसंघावर लक्ष

लोकसभा निवडणुकीनंतर आता खऱ्या अर्थाने वेध लागले ते राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे. अवघ्या काही महिन्यांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. अकोला जिल्ह्यातही विविध पक्ष आणि इच्छुकांकडून मतदारसंघावर दावे – प्रतिदावे करण्यात येत आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाकडे महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गट आणि शिवसेना शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे.

महायुतीत जागावाटपावरून या मतदारसंघात चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. बाळापूर या मतदारसंघाचा जर विचार केला, तर बाळापूर मतदारसंघात बाळापूर आणि पातुर या दोन तालुक्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात मुस्लिम, मराठा, कुणबी आणि माळी मतांचे प्रमाण मोठे आहे. बाळापूर मतदारसंघात मुस्लिम मतदार हे निर्णायक भूमिका बजावतात. या मतदारसंघाने नेहमीच जातीच्या पलीकडे जात निवडणूक निकाल दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, असा सामना पाहायला मिळाला. आता विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघावर महायुतीतील दोन पक्षांची नजर आहे. तर भाजपचाही दावा या मतदार संघावर केला जाण्याची शक्यता आहे.

Congress Politics : जागा चार अन् काँग्रेसमध्ये चव्वेचाळीस दावेदार

दादांच्या गटाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर महायुतीच्या सत्तेत सहभागी झालेले अजित पवार यांची राष्ट्रवादी बाळापूर या मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी अनेकदा हा मतदारसंघ आमच्या पक्षाला सुटणार असल्याचं सांगितलं आहे. यावर आमचा दावा असणार आहे. तर आमदार मिटकरींनी येथे उमेदवार ही जाहीर करून टाकला आहे. स्व. विनायकराव मेटे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे संदीप पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षात आधीच प्रवेश केला आहे. ते या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. आमदार मिटकरींनीही त्यांची उमेदवारी अनेकदा जाहीर केली आहे. दुसरीकडे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी असताना हा मतदारसंघ राष्ट्रवादी साठी सुटला होता. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन पक्ष तयार झाले. महायुतीत असलेला राष्ट्रवादी या मतदारसंघावर आपला दावा करीत आहे.

धनुष्यबाण की मशाल 

शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत आहेत. त्यांच्या पक्षाकडूनही बाळापूर या मतदारसंघासाठी दावा केला जाण्याची शक्यता आहे. कारण जिथे शिवसेनेची ताकद मोठी त्या मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने लक्ष केंद्रित केले आहे. नुकतेच पक्ष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील बाळापूर या मतदारसंघात निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाने या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचा येथे आमदार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटही या मतदारसंघावर दावा करणार आहेत. एकंदरीतच शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!