महाराष्ट्र

Akola Constituency : अकोटमध्ये महायुतीतील तीन्ही पक्ष आमनेसामने!

Assembly Elections : भारसाकळेसह मिटकरी आणि बाजोरिया मैदानात; बाळापूर, अकोटात रस्सीखेच

Competition in Mahayuti : अखेर विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. मात्र महायुतीचे उमेदवार अद्यापही निश्चित व्हायचे आहेत. अशातच महायुतीतील नेत्यांची मतदारसंघांवरून मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. अकोट मतदारसंघावर भाजपसह महायुतीतील तीन्ही पक्षांच्या इच्छुकांकडून उमेदवारी मागण्यात आली आहे. या मतदारसंघासाठी विद्यमान भाजप आमदार प्रकाश भारसाकळे, अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. मात्र, जागा वाटप अंतिम टप्प्यात असल्याचा दावा करणाऱ्या महायुतीत अनेक मतदारसंघांवरून वाद रंगण्याची चिन्ह आहेत. भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघाच्या दावेदारीवरून तिन्ही पक्षांत रस्सीखेच सुरू आहे. या मतदारसंघासाठी तीन्ही पक्षांतील इच्छुक पुढे आले आहेत. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही या मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी अकोटमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

तिन्ही पक्षांत प्रतियोगिता

मिटकरी आणि बाजोरियांनी या मतदारसंघात भाजपच्या आमदाराविषयी नाराजी असल्याचा दावा केला आहे. जिल्ह्यातील पाचपैकी चार मतदारसंघांत सध्या भाजपचे विद्यमान आमदार आहेत. पाच पैकी पाचही मतदारसंघ भाजपला मिळावे अशी मागणी भाजपच्या नेत्यांकडून केली जात असल्याची माहिती आहे. मात्र महायुतीतील घटकपक्षांनीही पाचपैकी काही मतदारसंघांवर दावा केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच बैठकीत पाचही मतदारसंघात भाजप निवडून यावी असे म्हटले होते. मात्र महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे पक्ष जिल्ह्यातील अकोट आणि बाळापूर या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. दोन्ही पक्षातील नेत्यांनी अकोट आणि बाळापूर या दोन मतदारसंघांवर दावा करत उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

Buldhana : नेता पक्ष सोडून गेला, कार्यकर्ते म्हणतात ‘बला टळली’!

सध्या भाजपच्या ताब्यात असलेल्या अकोट मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार गोपिकीशन बाजोरिया यांनी तयारी सुरू केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही हे मतदारसंघात आपण मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याचा दावा करीत येथील जनता आपल्या सोबत असल्याचं म्हणत दावा ठोकला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते गोपीकिशन बाजोरिया हे सलग तीन टर्म विधान परिषदेचे आमदार होते. 2021 मध्ये अकोला स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तेव्हापासून बाजोरिया नवीन संधीच्या शोधात असल्याची चर्चा आहे. सलग तीनवेळा विधानपरिषदेचे आमदार राहिलेल्या बाजोरिया यांना यावेळी जनतेतून आमदार व्हायचं आहे. तर भाजपचे प्रकाश भारसाकळे 2014 पासून सलग दोनदा येथून विजयी झाले आहेत. त्यामुळे तिसऱ्यांदा आपलीच उमेदवारी पक्की असल्याचा त्यांना विश्वास आहे.

बाळापूरमध्येही तिच परिस्थिती

अकोट सह बाळापूर मतदारसंघातही महायुतीच्या तीन्ही पक्षांत मोठी ओढाताण सुरू आहे. बाळापूरसाठी भाजपसह सेनाही इच्छुक आहे. तर अजित पवार गटाचे संदीप पाटील यांनीही या मतदारसंघात शड्डू ठोकला आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे विठ्ठल सरप, रामेश्वर पवळ हे इच्छुक आहेत. त्यामुळे याही मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीत मोठी घमासान होण्याची शक्यता आहे.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!