महाराष्ट्र

Akola Heavy Rain : पावसाने दाणादाण; प्रशासनाबद्दल संताप

Citizen In Trouble : आमदार रणधीर सावरकर धावले मदतीला

Monsoon Session : राज्यासह अकोला जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. अकोल्यात रात्रभर पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले. रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले. सखल भाग तलाव झालेत. रेल्वे वाहतुकीवर (Railway Traffic) देखील परिणाम झाला आहे. मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने अकोल्यातून अधिवेशनासाठी मुंबईला जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनाही याचा फटका बसला. मोरगाव भाकरे येथे अतिवृष्टीने भिंत कोसळून एका ज्येष्ठ व्यक्तीचा मृत्यू झाला. 83 घरांचे नुकसान झाले.

अडचणीत सापडलेल्या नागरीकांसाठी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी तत्परता दाखविली. तत्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचे आदेश त्यांनी दिले. कुलगाम येथील दहशतवादी चकमकीत शहीद झालेले जवान प्रवीण जंजाळ यांच्या पार्थिवावर त्यांच्या गावात पावसाळी सावटात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेत. जिल्हा प्रशासनाने या गावात उशिरापर्यंत कुठलीही तयारी केली नसल्याचा धक्कादायक प्रकारही घडला. परिणामी गावकरी आणि शहीद प्रवीण यांचे भावाने प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली.

अनेक ठिकाणी तारांबळ

जून महिना संपला मात्र जिल्ह्यात दमदार पाऊस नव्हता. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे (Drought) सावट होते. हवामान विभागाचे सर्वच अंदाज चुकीचे ठरले. अखेर 7 जुलैपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. रात्रीपासून सोमवारी (ता. सात) दुपारपर्यंत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे सर्वत्र दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहरातील नालेसफाईची पोलखोल पावसामुळे झाली. शहरातील मुख्य रस्त्यावरून नाल्यांचे अस्वच्छ पाणी वाहात होते. याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. महापालिका प्रशासनाच्या (Municipal Corporation) ढिसाळ कारभाराचा सर्वांना फटका बसला.

संततधार पावसामुळे जिल्ह्यातील अकोट राज्य महामार्गावरील चोहट्टा बाजार जवळच्या शहानूर नदी जवळच्या मुख्य रस्त्याच्या बाजूचा भराव खचला. मुंबई येथे विधिमंडळ पावसाळी अधिवशनासाठी गेलेल्या आमदार रणधीर सावरकर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दखल घेतली. राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांशी (NHAI) संपर्क साधून त्यांनी रस्त्याच्या दुरुस्तीचे निर्देश दिले. आमदार सावरकर यांच्या निर्देशानंतर सबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जात भरावाच्या दुरस्तीला सुरुवात केली.

अडकलेले लोक सुखरूप 

अकोला तालुक्यातील खरप येथे पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले. खरप गावाजवळ रस्‍त्‍याचे काम सुरू असताना अचानक जवळ असलेल्‍या बन्‍सी नाल्‍याला मोठा पूर आला. पुराच्या पाण्‍यामुळे जेसीबीचे (JCB) चालक राम पटेल, विक्रम सिंग, तसेच मजूर संजय बागूल, सोमन दिवे, विजय पवार, करण कसबेकर, मुन्‍ना चितकार, जयसिंग चतूर, गोलु धायकर हे अडकले होते. त्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

भौरद व गायगावला जोडणारा शेगाव रस्त्यावरील पुलावरील पाण्यामुळे मार्ग बंद झाला. उगवा व आगर रस्त्यावर मोर्णा नदीचे पाणी असल्याने हा मार्ग देखील बंद झाला. शहरातील जुनेशहर भागातील नागरिकांच्या घरात नाल्यांमधील पाणी शिरल्याने संतप्त नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील किराणा मार्केट समोर रास्तारोको केले. महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे रुंद नाला अरुंद झाला. वारंवार महापालिकेला कळविल्यावरही काम न झाल्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला. जोपर्यंत जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त येणार नाहीत, तोपर्यंत रास्तारोको करू असा इशारा नागरिकांनी दिला होता.

आंदोलनामुळे महामार्गावर वाहतूक खोळंबली होती. वाहनांच्या रांगा महामार्गावर लागल्या होत्या. संतप्त नागरिकांनी रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून देत माणुसकीचा प्रत्यय दिला आहे. आंदोलनस्थळी खासदार अनुप धोत्रे (Anup Dhotre) तातडीले दाखल झालेत. त्यांनी संतप्त नागरिकांची समजूत घातली. त्यानंतर नागरिक शांत झालेत. आंदोलन स्थळानंतर खासदार धोत्रे तत्काळ महापालिकेत पोहोचले. त्यांनी नागरिकांच्या समस्यांबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा केली. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यात याव्या, असे निर्देश त्यांनी दिले.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!