महाराष्ट्र

Lok Sabha Election : मेळघाटात रस्ता नाही, वीज नाही; मतदानही नाही

Amravati Constituency : आदिवासी गावांचा मतदानावर बहिष्कार 

Rural Development Issue : मेळघाटातील आदिवासी गावांनी लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घातला आहे. धारणी तालुक्यात येणाऱ्या रंगूबेली, धोकडा, कुंड आणि खामदा ही ती गावे आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील ही अतिदुर्गम गावे आहेत. सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात ही गावे वसली आहेत. स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली तरी या गावांमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. रस्ता, वीज नाही. 

अतिदुर्गम भागात वसलेल्या या चारही गावांना बाहेरच्या जगाशी जोडणारे रस्ते नाहीत. गावात वाहन येऊच शकत नाही. चारही गावांमध्ये वीज नाही. आरोग्य सेवा देखील या गावांमध्ये उपलब्ध नाही. अनेकदा तक्रार आणि निवेदन सादर करून झाले. मात्र गावाच्या कुठल्याही प्रश्नांसंदर्भात कोणी दखल घेतली नाही. त्यामुळे या चारही गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत निवडणुकीवर बहिष्कार घातला. रंगूबेली धोकडा, कुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्र पूर्णवेळ ओस पडून होते. एकानेही मतदान केले नाही.

अधिकारी धावले 

एकाचवेळी चार गावांनी मतदानावर बहिष्कार घेतला. ही माहिती मिळताच प्रशासनात खळबळ उडाली. अधिकारी गावाकडे धावले. त्यांनी चारही गावांतील आदिवासी मतदारांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा फायदा झाला नाही. आजवर निवडून दिलेल्या एकाही लोकप्रतिनिधिने आमच्या गावांना मूलभूत सेवासुविधा पुरवल्या नाहीत. परिणामी आम्ही नाईलाजास्तव हे टोकाचे पाऊल उचलल्याची भावना या गावातील गावकऱ्यांनी व्यक्त केली.

राणा यांच्याबद्दल संताप

मेळघाट भागातील आदिवासी पाड्यात नवनीत राणा यांच्याबद्दल संताप आहे. होळी उत्सवानिमित्त त्यांनी महिलांना साड्यांचे वाटप केले होते. या साड्या अक्षरश: मच्छरदाणी सारख्या पारदर्शक होत्या. आदिवासी महिलांनी यावरून नवनीत कौर राणांचा चांगलाच समाचार घेतला होता. केवळ मेळघाटच्या आदिवासी पाड्यातच या साड्यांच वाटप करण्यात आले होते.

मेळघाटची व्याप्ती 

मेळघाटमध्ये अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी हे दोन तालुके येतात. हे विस्तीर्ण वनक्षेत्र आहे. हे सुमारे 4 हजार 426 वर्ग किलोमीटर भौगोलिक क्षेत्र मेळघाट व्यापते. यापैकी 3 हजार 630 वर्ग किलोमीटर चिखलदऱ्यात आहे. 197 गावांमध्ये सुमारे 76 हजार लोकसंख्या आहे. येथे घनदाट जंगलाचे आच्छादन आहे. धारणी तहसील 796 वर्ग किलोमीटर भागात आहे. येथे 153 गावांमध्ये 1.13 लाख लोकसंख्या आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना मेळघाटमधील आदीवासी मतदारांनी साथ दिली होती.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!