महाराष्ट्र

IAS Puja Khedkar : ओबीसी कोट्यातून डॉक्टरच्या पदवीसाठी प्रयत्न 

MBBS Education : पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश 

OBC Non Creamy Layer Quota : आयएएस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्या आहेत. त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराबद्दल सतत धक्कादायक बाबी समोर येत आहेत. आता त्यांनी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून एमबीबीएस प्रवेश घेतल्याचे समोर आले आहे. पूजा यांनी 2003 मध्ये पुण्याच्या काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात ओबीसी भटक्या जमाती-तीन या प्रवर्गातून प्रवेश घेतला होता.हा प्रवर्ग वंजारी जातीसाठी राखीव आहे.

पूजा खेडकर याच प्रवर्गातून येत असल्याची माहिती आहे. एमबीबीएसच्या प्रवेशासाठी ओबीसी नॉन क्रिमिलेयर प्रवर्गातून प्रवेश घेतला, त्यावेळी त्यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र सरकारमध्ये आयएएस अधिकारी म्हणून कार्यरत होते. पूजा यांनी प्रवेश परीक्षेत 200 पैकी 146 गुण मिळविले. त्यानंतर त्यांना खासगी महाविद्यालय मिळाले. नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे, अशी अट आहे. दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची 40 कोटींहून अधिक मालमत्ता असल्याचे दाखवले. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

मनोरमा खेडकर नॉट रिचेबल

पूजा खेडकर चर्चेत आल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकरही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात त्या हातात पिस्तुल घेऊन गावकऱ्यांना धमकावत असल्याचे दिसते. याप्रकरणी पुणे पोलिसांनी त्यांच्यासह पाचजणांवर गुन्हा दाखल केला आहे. चौकशी करण्याकरता पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला. चौकशी करण्याकरता पुणे ग्रामीण पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असलेले एक पथक शहरातील बाणेर रोड येथील मनोरमा (Manorama Khedkar) यांच्या बंगल्यावर गेले. परंतु मनोरमा खेडकर त्यांना भेटल्या नाही. आम्ही रविवारी आणि सोमवारी खेडकर यांच्या घरी भेट दिली. पण आवारात प्रवेश करू शकलो नाही. मनोरमा यांचा मोबाइलही बंद आहे. एकदा आम्ही ताब्यात घेतले की चौकशी केली जाईल. कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पुणे ग्रामीण पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

अभिषेक सिंह देखील चर्चेत 

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यानंतर आणखी एक अधिकारी अभिषेक सिंह वादात सापडला आहे. अभिषेकवर बनावट प्रमाणपत्राचा वापर करून अपंग कोट्याअंतर्गत यूपीएससीमध्ये निवड झाल्याचा आरोप आहे. अभिषेक 2011 मधील बॅचचा आयएएस अधिकारी आहे. त्याने ऑक्टोबर 2023 मध्ये राजीनामा दिला होता. अभिषेक सिंहने दिव्यांग प्रवर्गातून केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्याने स्वत:ला लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजेच चालण्यास असमर्थ असल्याचे वर्णन केले होते. अभिनय करायचा असल्याने अभिषेकने आयएएसचा राजीनामा दिला होता.

अभिषेकचे जिम वर्कआउट आणि डान्सचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. तेव्हापासून त्यांच्या दिव्यांग प्रवर्गातील निवडीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या सर्व आरोपांना प्रत्युत्तर देताना अभिषेक सिंगने ट्विटरवर लिहिले की, मला कोणत्याही टीकेची पर्वा नाही. माझ्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे की, मी माझ्या टीकाकारांना उत्तर देत आहे. माझे वडील आयपीएस अधिकारी होते. त्यामुळे मला फायदा झाला. माझे वडील अतिशय गरीब परिस्थितीतून आले आहेत. ते पीपीएस अधिकारी झाले. त्यांना आयपीएस म्हणून बढती मिळाली. माझ्या संपूर्ण कुटुंबात आयएएसमध्ये निवड झालेला मी एकटाच आहे. अभिनय करायचा असल्याने मी राजीनामा दिला.

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!