महाराष्ट्र

Ravikant Tupkar : आता तुपकरांनी ठोकला कृषी अधीक्षकांच्या दालनात मुक्काम !

Superintendent of Agriculture : कृषी अधीक्षक कार्यालयाला छावणीचे स्वरूप 

Ravikant Tupkar : कृषी विभागाच्या गलथान कारभाराला शेतकरी नेते रविकांत तुपकर चांगलेच वैतागले. याबाबत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर गुरुवारी (ता. 26) त्यांनी बुलढाणा जिल्हा कृषी अधिकारी तथा अधीक्षकांच्या दालनात मुक्काम ठोकला. गादी आणि उशी घेऊन त्यांनी मुक्काम आंदोलन छेडले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

शेतकऱ्यांसाठी आंदोलन

शेतकऱ्यांच्या हक्काचा पिकविमा तात्काळ जमा करा, असे म्हणत तुपकरांनी जिल्हा कृषि अधिकाऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे. रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आंदोलने केली. परंतु कृषी विभागाचा कारभार आजवर रोषात्मकच राहिला आहे. रब्बी आणि खरीप हंगामातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशात विमा कंपनीने मोठा घोळ केला. एका शेतकऱ्याला जास्त तर इतर शेतकऱ्यांना कमी असे पैसे दिल्याचा आरोप केला जात आहे.

अनेक शेतकरी पिक विम्यापासून अद्यापही वंचित आहेत. कृषी विभागाकडून तारीख पे तारीख दिल्या जात आहेत. विशेष म्हणजे तुपकर यांनी असा आरोप केला की, कृषी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या नसताना बोगस पंचनामा करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रविकांत तूपकर यांनी आज जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या दालनात गादी आणि उशी घेऊन मुक्काम आंदोलन सुरु केले आहे.

आंदोलन मागे घेणार नाही

जोपर्यंत 100% शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे जमा होत नाहीच, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. शिवाय नऊ महिने हे पैसे देण्यासाठी उशीर का झाला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 12% व्याजाने पैसे घेण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याचे सांगत त्यांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्र घेतला आहे.

Mumbai Police : रविकांत तुपकर यांना मुंबईत अटक

सरकारकडून वारंवार तारीख पे तारीख देण्यात येत असल्याच्या धोरणाचा तुपकर यांनी निषेध केला. 15 सप्टेंबरपर्यंत पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा शब्द कृषी सचिवांनी याआधी दिला होता. तो शब्द सरकारने पाळला नाही. म्हणून तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जिल्हा कृषी अधीक्षक मनोज ढगे यांच्या कार्यालयात तुपकर अंथरूण आणि पांघरून सोबत घेऊन गेले.

मुक्काम आंदोलन

जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याचे पैसे पडत नाहीत, तोपर्यंत आपण इथेच मुक्काम करणार आहे, असे म्हणत रविकांत तुपकर यांनी मुक्काम आंदोलन चालू केले. हे कळताच शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षक कार्यालयासमोर मोठी गर्दी केली. कृषी अधीक्षक कार्यालयात पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला असून कार्यालयाला छावणीचे स्वरूप आले आहे.

error: Content is protected !!