Buldhana district : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा येथील अवैध वाळू विक्री विरोधात आतापर्यंत झोपलेल्या प्रशासनाला जाग आली. आणि आता कारवाई करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील खुद्द फिल्डवर येत असून गेल्या दोन दिवसात केलेल्या विविध कारवाईत 2200 ब्रास अवैध वाळू जप्त करण्यात आली आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. जप्त केलेली वाळू शासकीय कामे, घरकुल किंवा अन्य कामासाठी आवश्यक असलेल्यांना जागीच लिलाव करून देण्यात आली.
राजकीय वरदहस्त व महसूल विभागामधील झारीतील शुक्राचार्य ठरलेले काही अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण पाठबळामुळे बुलढाणा जिल्ह्यात वाळू माफियांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोणासही न जुमानता कायदा पायदळी तुडविण्याला जात आहे. रात्रीच नव्हेतर दिवसाढवळ्या अत्याधुनिक बोटींच्या माध्यमातून दररोज हजारो ब्रास रेतीचा उपसा करत जिल्ह्यातील नद्यांची चाळण केली आहे.
पर्यावरणाचा -हास
उपशामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच संत चोखासागर जलाशय परिसरातील गावातच पाणी टंचाईचे चटके जाणवत आहे. इतकेच नाही तर व्यावसायीक स्पर्धेपोटी रेती तस्करी करणाऱ्या टिप्परने आठ निरपराधांचे बळी घेतल्यांनतर प्रशासनाला काहीच सोयरसुतक नव्हते. आता संवेदना जागी झालेले जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी वातानुकूलीत दालनातून बाहेर पडून डिग्रस (ता. सिंदखेड राजा) गाठून गावाची झाडाझडती घेतली. स्वतः हजारो ब्रास रेती जप्तीची कारवाई केली. जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरुन कारवाई केल्याने आजवर मस्तावलेल्या वाळू माफियांच्या उरात चांगलीच धडकी भरली आहे. ते सैरावैरा पळत सुटल्याचे दिसून आले.
या कारवाईत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार प्रवीण धानोरकर, वैशाली डोंगरजाळ, नायब तहसीलदार प्रांजली पवार, ठाणेदार विकास पाटील, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी यांचा सहभाग होता.
Atul Londhe : गुन्हेगार होतात फरार; कारण गृहमंत्री बेजबाबदार..
जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश
जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी चिंचखेड येथे भेट दिली. याठिकाणी अवैध उत्खनन करणाऱ्या बोटी आढळून आल्यास त्या नष्ट कराव्या. तसेच अवैध वाहतूक करणारे रस्ते खोदून बंद करण्याच्या सूचना दिल्या. आवश्यकतेप्रमाणे एनडीआरएफ पथक व इतर मदत उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विना क्रमांकाची वाहने व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकाऱ्यांना बसला आश्चर्याचा धक्का !
दरम्यान, वाळू माफियांमुळे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. अनेकांनी तर आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. तक्रारी, आंदोलनामुळे हतबल झालेल्या प्रशासनापुढे कारवाई हा एकच पर्याय उरला होता. दरम्यान, उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे, देऊळगाव राजाचे तहसीलदार डॉ. गरजाळ, सिंदखेड राजा तहसीलदार धानोरकर यांनी ‘कारवाईस्त्र’ उपसले होते. त्यांच्या पाठोपाठ आता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील हे देखील रस्त्यावर उतरले. दिग्रसमध्ये पोहोचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेस पडलेली अवैध रेती पाहून त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.