महाराष्ट्र

Amravati Police : टी. राजा तिवसा पोलिसांकडून स्थानबद्ध

Telangana BJP : वादग्रस्त वक्तव्य न करण्याच्या अटीवर मुक्तता

Provocative Statement : तेलंगणातील भाजपाचे नेते आणि प्रखर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले टी. राजा सिंह यांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांनी स्थानबद्ध केले. परतवाडा येथील दहीहंडी सोहळ्यासाठी आमदार टी. राजा सिंह हे आले होते. तासभर त्यांना तिवसा पोलिस ठाण्यामध्ये बसविण्यात आले. कोणतेही आक्षेपार्ह विधान करणार नाही, या अटीवर नोटीस बजावत पोलिसांनी त्यांची मुक्तता केली. आमदार टी. राजा सिंह हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. 

वर्षभरापूर्वी प्रेषिताबद्दलच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना तेलंगण भाजपामधून निलंबित करण्यात आले होते. वर्षभर पक्षापासून लांब ठेवल्यानंतर भाजपने दोन महिन्यांपूर्वी टी. राजा सिंह यांचं पुनर्वसन केलं. भाजपाने त्यांना गोशामहल या मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली. राजा सिंह यांनी पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत विजय मिळविला. टी. राजा सिंह यांची अनेक वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. परतवाडा येथील दहीहंडी कार्यक्रमात ते येणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांना कळले.

तत्काळ कारवाई

आमदार राजा यांच्याबाबत समजताच मंगळवारी (ता. 27) दुपारी तिवसा येथील पेट्रोल पंपाजवळ त्यांचा ताफा रोखण्यात आला. यामुळे त्यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांसोबत पोलिसांचा शाब्दिक वाद झाला. पोलिसांच्या ताफ्यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना देखील त्याबाबत माहिती देण्यात आली. आमदार टी. राजा सिंह यांना स्थानबद्ध केल्यामुळे तिवसा पोलीस ठाण्या समोर मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. कार्यक्रमादरम्यान टी. राजा यांनी कोणतेही प्रक्षोभक विधान करू नये, अशी अट घालण्यात आली. पोलिसांनी त्यांना याबाबत सूचना दिली.

Congress : पुतळा कोसळल्यानंतर सरकारविरोधात निदर्शने

टी. राजा यांना नोटीस देऊन नंतर त्यांची मुक्तता करण्यात आली. पोलिसांनी मुक्तता केल्यानंतर टी. राजा दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी परतवाड्याच्या दिशेने रवाना झालेत. अमरावती जिल्ह्यातील वातावरणात दूषित झाल्यास त्याला पोलिस जबाबदार राहतील. काँग्रेसच्या तिवसा येथील आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी हा इशारा पोलिस अधीक्षकांना यानंतर दिला. अमरावतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा वातावरण तापत आहे. सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चात बंदूक देण्याची भाषा करण्यात आली. या मोर्चानंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षात अमरावती जिल्ह्यात प्रक्षोभक विधानांमुळे तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात आता विधानभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे पोलिसही जोखीम पत्करण्याच्या मनस्थितीत नसल्याने कारवाई करण्यात येत आहे.

error: Content is protected !!